24 January 2020

News Flash

आता आव्हान स्वच्छतेचे

मृत जनावरे, कुजलेला कचरा, शेवाळयुक्त गाळामुळे अनेक परिसरांत दुर्गंधी

|| अर्जुन नलवडे

मृत जनावरे, कुजलेला कचरा, शेवाळयुक्त गाळामुळे अनेक परिसरांत दुर्गंधी

मध्य शहरातील पुराचे पाणी हळूहळू ओसरत असले तरी पाण्यातून वाहत आलेली मृत जनावरे, कुजलेला कचरा, शेवाळयुक्त गाळ, लाकडाचे ओंडके आणि अस्वच्छ पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांमुळे अनेक परिसरांत दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनासमोर नागरिक आणि स्थलांतरितांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

कोल्हापुरातील पंचगंगा तालीम परिसर, दुधाळी, लक्षतीर्थ वसाहत, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, व्हिनस कार्नर, ओढय़ावरील रेणुका मंदिर परिसर, कसबा बावडा, नागाळा पार्क, लाइन बाजार, उलपे मळा, धान्य गोडाऊन परिसर, रमणमळा, महावीर महाविद्यालय परिसर, न्यू पॅलेस परिसर, पोवार मळा, कदमवाडी, बापट कॅम्प, सिद्धार्थनगर अशा सुमारे २६ पूरबाधित क्षेत्रांमध्ये महापुराचे पाणी ओसरत आहे. मात्र इमारती, घरे, विविध गल्ल्यांमधून, जनावरांच्या गोठय़ांतून, दुकानांतून दुर्गंधीयुक्त कचरा आणि गाळ मोठय़ा प्रमाणात पसरलेला आहे. काही पूरग्रस्तांनी आपापल्या घरात प्रवेश करून वैयक्तिक पातळीवर घरांमध्ये आणि दुकानांमध्ये औषध फवारणी सुरू केलेली आहे.

कोल्हापूर महापालिकेचे आरोग्य निरीक्षक अरिवद कांबळे यासंदर्भात माहिती देताना म्हणाले की, शुक्रवारी मध्यरात्रीपासून शहरातील पाणी कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून डंपर आणि जेसीबीच्या साह्य़ाने परिसरातील घाण काढण्यास सुरुवात केलेली आहे. त्याकरिता आरोग्य विभागाचे सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांमार्फत विविध परिसरांमध्ये मॅलेथान, चिनॅलफॅस, सोलटॅक्स, सायफ्रोथ्रिन आणि डास आळीनाशक टेमाफास आदी औषधांची फवारणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याचबरोबर पाण्यातून आलेला कचरा जेसीबी आणि डंपरच्या साह्य़ाने काढण्याचे काम सुरू आहे.

शहराच्या वेगवेगळ्या भागांत पूरग्रस्तांना आरोग्य प्रशासनाकडून ताप, सर्दी, खोकला, अंगदुखीवरील औषधे दिली जात आहेत. प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या काळे यांनी सांगितले की, शहरातील चित्रदुर्ग सभागृह, मुस्लीम बोर्डिग, शाहू सांस्कृतिक सभागृह अशा २६ मुख्य ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ११ नागरी आरोग्य केंद्रे उभी करण्यात आली आहेत. डॉक्टर आणि मदतनीसांच्या साह्य़ाने पूरग्रस्तांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहेच. औषधे पुरविली जात आहेत.

पूरग्रस्तांसाठी शहरात विविध ठिकाणी आरोग्य केंद्रे उभी केलेली आहेत. त्या ठिकाणी महापालिकेचे आरोग्य अधिकारी नियुक्त केलेले आहेत. पूर ओसरलेल्या भागांतील स्वच्छतेला प्रथम प्राधान्य प्रशासनाकडून देण्यात आलेले आहे. तसेच औषध फवारणीचे कामही मोठय़ा प्रमाणात सुरू केलेले आहे. सध्या पाण्यातून वाहून आलेली माती, प्लास्टिक आणि दुर्गंधीयुक्त मृत जनावरे जेसीबी आणि डंपरच्या साह्य़ाने काढण्याचे काम सुरू आहे.     – मल्लीनाथ कलशेट्टी, आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका

प्रयाग चिखली, आंबेवाडी, मध्य शहरातील पूरबाधित घरे आणि परिसरांत मोठय़ा प्रमाणात सरपटणारे (साप, नाग, येरूळे) प्राणी शिरलेले होते. आतापर्यंत ५० पेक्षा जास्त घरांमध्ये शिरलेले साप बाहेर काढण्यात आलेले आहेत. तसेच पुरात अडकलेली पाळीव जनावरे (बल, गाय, म्हैस, मांजरे आणि कुत्री) यांना सुखरूप काढण्याचे काम सुरू आहे.      –  देवेंद्र भोसले, कार्यकत्रे, वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अ‍ॅन्ड रीसर्च. 

First Published on August 11, 2019 1:56 am

Web Title: viral infection flood in maharashtra mpg 94
Next Stories
1 बंद महामार्गावरील प्रवासी, चालक, वाहकांना बंधुत्वाचा आधार
2 मदतकार्यास वेग, पूर ओसरू लागला.. भीतीची छायाही दूर
3 अश्रूंचाही महापूर
Just Now!
X