|| दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे

कोल्हापूर आणि सांगली शहरात पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असून, मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पाणी ओसरत असले तरी अजून सांगलीत पाणी धोक्याच्या पातळीवर आहे, कोल्हापुरात पंचगंगेचे पाणी वेगाने उतरत असून  चंदगड, शिरोळ तालुक्यात पुराचे संकट कायम आहे.

साथीच्या रोगांची भीती असल्याने राज्यातील अनेक शहरांतून वैद्यकीय पथकेही येथे दाखल झाली आहेत. अगदी बोटीत बसूनही पूरग्रस्तांची तपासणी करण्यात येत आहे. अलमट्टी धरणातून विक्रमी ५ लाख ४० हजार क्युसेकचा विक्रमी विसर्ग सुरू झाल्याने पुराच्या पाण्याची पातळी कमी होत आहे. ताशी एक इंचाने पाणी पातळी कमी होत असली तरी सगळा पूर ओसरण्यास दोन-तीन दिवसांचा अवधी लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला. कोल्हापुरात पाण्याची पातळी कमी झाल्याने मदतकार्याला वेग आला असून काही ठिकाणी पाणी असल्याने शिरोळमधून आणखी ४५ हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

पंचगंगेच्या पातळीत घट

पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रथमच ५० फुटापेक्षा कमी झाली. शिरोळ तालुक्यात बचाव कार्याला तर कोल्हापूर शहरासह अन्यत्र मदतकार्याला वेग आला आहे. चंदगड, शिरोळ तालुक्यात महापुराचे संकट अद्यापही आहे. शिरोळमधून दीड लाखाहून अधिक जणांचे स्थलांतर करण्यात आले.

वाहतूक उद्यापासून सुरू

पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणीपातळी कमी होत आहे. शनिवारी सायंकाळी ५१ फूट ६ इंच असणारी पाणीपातळी २४ तासांत ४९ फूट १० इंच इतकी कमी झाली. अद्यापही १०४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पुणे-बेंगळुरू या राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी प्रायोगिक वाहतूक सुरू केली. अद्याप महामार्गावर पाणी असल्याने वाहतूक सुरू करण्यास मर्यादा आल्या. सोमवापर्यंत वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.

सेवाभावी संस्थांनाही मदत

गावात राहिलेल्या पूरग्रस्तांना प्रती दिन प्रतीमाणसी ६० रुपये, तर लहान मुलांना ४५ रुपये गावात जाऊन दिले जाणार आहेत. शिबिरांमध्ये पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू पुरविणाऱ्या सेवाभावी संस्थाना शासकीय दराने प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

स्वच्छता मोहीम सुरू

सांगली शहराच्या हिराबाग, कॉलेज कॉर्नर, झुलेलाल चौक, बालाजी चौक येथील महापुराचे पाणी कमी झाले असले, तरी अद्याप गावभाग, राजवाडा चौक, हरभट रोड, टिळक चौक, मारुती रोड, कर्नाळ रोड आदी भागांत पाणी आहे.

सांगलीवाडीतही काही भागांतील काही मार्ग मोकळे झाले असून पाणी मागे गेलेल्या भागांत महापालिकेने स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे. शहरातील स्वच्छतेसाठी लातूर, जेजुरी नगरपालिकेने वाहन, कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत.

मदत साहित्य जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि काळी खण येथे महापालिकेचे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. समाजकल्याणमंत्री खाडे आणि महापौर खोत यांनी रविवारी पूरग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रांना भेटी देऊन अडचणी जाणून घेतल्या.

सांगलीत पाणी धोकापातळीवरच

कृष्णा नदीतील पाणीपातळी ओसरू लागली असली, तरी अद्याप धोका रेषेच्या खाली पाणी गेलेले नाही. सांगलीच्या आयर्वनि पुलाजवळ रविवारी सायंकाळी पाणीपातळी ५३ फूट ५ इंच (धोकापातळी ४५ फूट) होती.

पवारांची सांगलीत भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागाला भेट दिली. पलूस तालुक्यातील विविध पूरग्रस्त भागाला भेटी दिल्यानंतर सायंकाळी सांगलीत त्यांनी पाहणी केली. राज्य सरकारला केंद्र सरकारने मदत करण्याची गरज आहे. सांगलीतील पाणी कमी करण्यासाठी कर्नाटक सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. तरच सांगलीतील पूरस्थिती आटोक्यात येऊ शकेल असे त्यांनी सांगितले.

महावितरणचे कर्मचारी सांगलीत

महावितरणचे राज्यभरातील हजारो हात कोल्हापूर व सांगलीच्या मदतीला धावून वीजपुरवठा सुरळीत करणार आहेत. महावितरण प्रशासनाने वरिष्ठ पातळीवर काटेकोर नियोजन केल्याने आवश्यक असणारे सर्व साहित्य पूर ओसरण्यापूर्वीच पोहोचणार आहे. महापुरामुळे दोन जिल्ह्यातील ३ लाखांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खबरदारीपोटी खंडित करावा लागला होता.

शिरोळमधून पूरग्रस्तांचे स्थलांतर

काही भागांत पाणी साचल्याने शिरोळमधून ४५ हजार व्यक्तींचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. यात शिरोळ तालुक्यातील ४२ गावांमधून ३१ हजार कुटुंबांतील सुमारे दीड लाख व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर झाले आहे.

बकरी ईद कार्यक्रम रद्द, पूरग्रस्तांना निधी

कोल्हापुरात मुस्लिम बोर्डिंग येथे सोमवारी सकाळी बकरी ईदची नमाज होणार आहे. त्याचबरोबर अन्य मस्जिद आणि ईदगाह मैदानावर सुद्धा नमाज होणार आहे. त्यानंतर पूरग्रस्तांसाठी सामूहिक प्रार्थना होणार आहे. बकरी ईद कार्यक्रमाचा निधी पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे.