काँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्यावर दोन जण पैशांची उधळण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गणेशोत्सवात नसीम खान यांच्यावर पैशांचा पाऊस पाडण्यात आला आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच नसीम खान यांच्यावर टीका देखील होत आहे.

आमदार नसीम खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नसीम खान हे एका गणेशोत्सवात गेले होते. या गणेशोत्सवात नसीम खान यांच्यावर दोन जणांनी पैशांचा पाऊस पाडला. पैशांची उधळण करतानाच हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. गणेशोत्सवात असा प्रकार घडल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आमदार नसीम खान यांनी एका वृत्तवाहिनीला यावर प्रतिक्रिया दिली. ‘भानुशाली समाजाच्या गणेशोत्सवाला मी गेलो होतो. तिथे मंडपात दोन जण माझ्यावर पैशांची उधळण करु लागले. मी काही वेळेसाठीच तिथे गेलो होतो. मी त्यांना रोखण्याचाही प्रयत्न केला. पण त्यांच्या परंपरेत अडथळा आणणे मला योग्य  वाटले नाही. मी असे काही केले असते तर वाद निर्माण झाला असता. पैसे मी उडवलेले नाहीत. माझ्या हातून कोणतेही चुकीचे काम झालेले नाही’, असे सांगत त्यांनी दिलगिरी व्यक्त करण्यास नकार दिला. तर भाजपा, शिवसेना या पक्षाच्या नेत्यांनी नसीम खान यांनी माफी मागावी तसेच त्यांच्यावर बहिष्कारच टाकला पाहिजे, अशी मागणी केली आहे. मी पेट्रोल व डिझेलसंदर्भात केलेल्या मागणीची बातमी दाखवता येत नाही. पण असे विनाकारण वाद निर्माण केले जातात,  असे सांगत त्यांनी माध्यमांवरही आगपाखड केली.

दरम्यान, मुंबईतील चांदिवली मतदारसंघातून निवडून येणारे नसीम खान यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पेट्रोल व डिझेलचे दर किमान १० रुपयांनी कमी करता येतील, असे म्हटले होते. राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांनी इंधनावरील कर कमी करुन नागरिकांना दिलासा दिला होता. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही पेट्रोल – डिझेलवरील कर कमी केल्यास दर किमान १० रुपयांनी कमी होतील, असे त्यांचे म्हणणे होते.