मुंबई – पुणे प्रवास आता आणखी वेगवान होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार आणि पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाने गुरुवारी व्हर्जिन हायपरलूप वन या कंपनीशी करार केला. कंपनी हायपरलूपच्या प्रस्तावित मार्गाचा अभ्यास करुन अहवाल सादर करणार आहे.

अमेरिकास्थित व्हर्जिन हायपूर वन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने पीएमआरडीएशी करार केला असून या कराराअंतर्गत हायपरलूपसाठी योग्य ठिकाणांची निवड करणे, तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञानात्मकदृष्ट्या या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासली जाणार आहे.  हायपरलूपमुळे दळणवळण क्षेत्रात मोठी क्रांती होईल. हायपरलूपमुळे मुंबई- पुणे हे अंतर अवघ्या १४ मिनिटांमध्ये गाठता येईल. सध्या कारने मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी किमान तीन तास लागतात. त्यामुळे हायपरलूप सेवा दोन्ही शहरांसाठी एक वरदान ठरु शकते.

हायपरलूप तंत्रज्ञान लागू होऊ शकेल का, या तंत्रज्ञानाचे फायदे आणि तसेच आर्थिक- सामाजिक घटकांचा विचार करता राज्यातील अन्य कोणत्या मार्गांवर ही सेवा सुरु करता येईल याचाही कंपनी अभ्यास करणार आहे. सध्या ही कंपनी यूएई, अमेरिका, कॅनडा, फिनलँड या देशांमध्ये सक्रीय आहे.  देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मुंबई आणि पुण्याचा समावेश होतो. त्यामुळे या मार्गावर ही सेवा उपयुक्त ठरु शकेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

काय आहे हायपरलूप?
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी रस्त्याच्या लगत किंवा रस्त्यापेक्षा उंच तसेच अगदी समुद्रातूनही मोठ्या वाहिन्या उभ्या केल्या जातात. या वाहिन्यांमधून ओर्का पॉड नावाचे वाहन प्रवास करते. कॅप्सूलच्या आकाराचे हे डबे असतात. हे डबे अंतराळ यानाच्या तंत्रज्ञानानुसार प्रवास करणार आहेत. यामुळे याचा वेग सुमारे १००० किमी प्रति तास इतका असणार आहे.