रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट शुक्रवारी (१५ जानेवारी) समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. त्यानंतर एकच खळबळ उडाली असून, शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. राजकीय पक्षांकडून सरकारला प्रश्न विचारले जात असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुलवामा आणि बालाकोटबद्दलचा व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट सोशल मीडियात व्हायरलं झालं. त्यानंतर देशात प्रंचड गदारोळ सुरू झाला आहे. संवेदनशील आणि गोपनिय माहितीची वाच्यता या संवादात करण्यात आलेली असल्यानं विरोधकांकडून याची चौकशी करण्याची मागणीही होत आहे. या मुद्द्यावरून वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात असताना पुलवामा आणि बालाकोट एअर स्ट्राईकवरून राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नांचा आणि उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे.

आणखी वाचा- मी तेव्हाच बोललो होतो, मोदी सरकारनं निवडणुकीसाठी बालाकोटचा वापर केला – पाक पंतप्रधान

पुलवामात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतानं पाकिस्तानातील बालाकोटमध्ये एअरस्ट्राईक केला होता. या सगळ्या घटनांवर त्यावेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यावेळी काही सवाल मोदी सरकारला केले होते. त्याचबरोबर अजित डोवाल यांची चौकशी करण्याची मागणीही केली होती. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा एक व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा- अर्णबच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करा – काँग्रेसची मागणी

काय आहे अर्णब गोस्वामी- दासगुप्ता यांच्यातील संवाद?

अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या संवादात पार्थ यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा उल्लेख निष्क्रिय (यूजलेस) असा केला आहे. त्याचबरोबर समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या संवादांत सर्व मंत्री आपल्याबरोबर आहेत, अशा शब्दांत गोस्वामी यांनी पार्थ यांना दिलासा दिल्याचे उघड झाले आहे. याशिवाय फेब्रुवारी २०१९मध्ये पुलवामा येथे अतिरेक्यांनी घडविलेल्या आत्मघातकी हल्ल्याबाबत अर्णब यांचे आक्षेपार्ह विधान आढळते. या हल्ल्यात ४० केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शहीद झाले होते. या व्हॉट्सअ‍ॅप संवादात पुलवामा हल्ल्याबाबत अर्णब यांनी केलेल्या विधानाचा समाचार नागरिकांनी ट्वीटरसह अन्य समाजमाध्यमांवरून घेतला.