सोलापूर जिल्हा परिषदेतील उपक्रम

सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘व्हर्च्युअल  फिल्ड ट्रिप’ या अभिनव शैक्षणिक प्रयोगाच्या अंमलबजावणीसाठी आता जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. देशभरातील मुलांकरिता हा उपक्रम येत्या रविवारी खुला होणार आहे. पुढे जगातील ८७ देशांतील शाळांशी परस्पर सहकार्यातून विज्ञान विषयातील अनेकविध संकल्पना समजावून घेण्याची संधी या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांतील मुलांना मिळणार आहे.

लहान मुलांना विज्ञानविषयक आवड निर्माण व्हावी, त्यांना प्रयोग करण्याची संधी मिळावी, या हेतूने हा उपक्रम सुरू होत आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्थल, काल त्यांच्या मर्यादा पार करून तंत्रस्नेहीशिक्षण देणारा हा देशातील पहिलाच शैक्षणिक प्रयोग मानला जात आहे. ‘व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप’ च्या माध्यमातून शिक्षण देणारा भारत हा जगातील आठवा देश ठरला असून शिक्षण क्षेत्रातील एक नवे पर्व यानिमित्ताने सुरू होत आहे.

यासाठी सोलापूर विज्ञान केंद्र, मायक्रोसॉफ्ट व जिल्हा परिषद याच्यात याबाबत सामंजस्य करार झाला असून येत्या रविवारी (१९ नोव्हेंबर) राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या हस्ते या अभिनव प्रयोगाचा प्रारंभ जि. प. सभागृहात होत आहे. भारतात मूलभूत क्षेत्रात संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांची कमतरता आहे, ही बाब नोबेल पुरस्कार मानक ऱ्यांच्या यादीवर दृष्टिक्षेप टाकला असता दिसून येते. विज्ञानासारखा विषय अनेकांच्या नावडीचा होण्याला अनेक कारणे आहेत. वर्गखोलीमध्ये प्रयोग करण्यासाठी साधने उपलब्ध नसणे हे त्यापैकीच एक कारण. प्राथमिक शाळांमध्ये पाठय़पुस्तकात दिलेले छोटे छोटे प्रयोग करण्यासाठी साधी साधी साधनेही उपलब्ध नसतात. प्रात्यक्षिक कार्यातून वैज्ञानिक सिध्दांत समजून घेण्याची संधी मुलांना मिळायला हवी. ‘सिम्युलेशन’ सारख्या तंत्रज्ञानामुळे वैज्ञानिक साधनांच्या अनुपलब्धतेच्या समस्येवर मात करता येणे आता शक्य झाले आहे.

मोबाइलच्या माध्यमातून शिक्षण देण्याकडे प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा कल वाढत आहे. ही बाब लक्षात घेता विज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्याच्या हेतूने ‘व्हर्च्युअल  फिल्ड ट्रिप’ आकारास येत आहे. पाठय़पुस्तकातील घटकांचे वास्तवातील अस्तित्व मुलांपर्यंत थेट पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. प्रयोगशील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी ही माहिती प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.

एक प्रयोगशाळा, तेथील साधने लाखो मुलांमध्ये प्रायोगिक कौशल्ये विकसनास कारणीभूत ठरतील, असा डिसले यांना विश्वास वाटतो. वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रयोग करण्यासाठीचे साहित्य उपलब्ध करून देणे आजवर शक्य झाले नाही, अशा शाळांतील मुलांना प्रयोग पाहण्याची संधी मिळेल. ‘स्काईप’च्या माध्यमातून थेट प्रसारित होणाऱ्या या ‘व्हर्च्युअल  फिल्ड ट्रिप’ मध्ये एखाद्या प्रयोगातील कृती विद्यार्थ्यांना समजली नाही, तर लगेच ती कृती तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून करवून घेऊ शकतात. तज्ज्ञ मार्गदर्शक कृती करीत असताना त्या कृतींचे निरीक्षण करण्याची, अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून विज्ञानातील नियम समजून घेण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची, आभासी स्वरूपात प्रयोग अनुभवण्याची संधी मुलांना मिळणार आहे. प्रयोग ही प्रत्यक्ष करून पाहण्याची बाब आहे. आगामी काळात जगातील ८७ देशातील शाळांशी परस्पर सहकार्यातून विज्ञान विषयातील अनेकविध संबोध समजावून घेण्याची संधीही जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

विज्ञान-तंत्रज्ञानाची ओळख

जिल्हा परिषद शाळांतून पारंपरिक शिक्षण घेणाऱ्या मुलांना विज्ञान-तंत्रज्ञानाची ओळख व्हावी व त्यांच्यात आवड निर्माण व्हावी, यासाठी हा प्रयोग हाती घेण्यात आला आहे. तो पुढील वर्षभर चालणार आहे.     – डॉ. राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर