|| लक्ष्मण राऊत

पतंगाच्या अवस्थेतच निर्मूलनाचा उपाय

कापसावरील शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कृषी विभागाने या हंगामात ‘कामगंध सापळे’ लावण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. ही संकल्पना जुनीच असली तरी गेल्या हंगामात बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीमुळे चालू हंगामात या उपाययोजनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

जालना जिल्ह्य़ातील कापूस पिकाच्या क्षेत्रावर जवळपास पावणेदोन लाख कामगंध सापळे बसविणे कृषी विभागाला अपेक्षित आहे. जालना जिल्ह्य़ातील कापूस पिकाखालील क्षेत्र जवळपास पावणेतीन लाख हेक्टर आहे. गेल्या हंगामात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे बी.टी. कापसाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावर उपाय म्हणून कामगंध सापळे लावण्याच्या संदर्भात कृषी विभागाने गेल्या दोन महिन्यांपासून मोहीम हाती घेतली आहे.

बोंडअळी तयार होण्याच्या आधी ती पतंगाच्या स्वरूपात असते. पतंगच नष्ट झाले तर बोंडअळीच तयार होणार नाही. त्यासाठी हा उपाय आहे. कापूस पिकाच्या शेतात वर नरसाळ्याच्या आकाराचे पात्र लावून त्याखाली प्लास्टिक पिशवी लावण्यात येते. त्यामध्ये ‘ल्यूर’ नावाची गंध असलेली गोळी ठेवली की बोंडअळीच्या पूर्वावस्थेतील नर पतंग त्याकडे आकृष्ट होतात. मादी बोंडअळीच्या पूर्वावस्थेतील पतंगाकडे आकृष्ट होणारे हे नर पतंग कामगंध जाळ्यात अडकून नंतर नष्ट होतात, अशी ही संकल्पना आहे. ही संकल्पना जुनीच असली तरी कापसाच्या पिकासाठी तिचा विचारच केला जात नव्हता. आता मराठवाडय़ासह राज्यभर ही संकल्पना विचारात घेतली जात आहे.

जिल्ह्य़ातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून दीड लाख कामगंध सापळे बसतील, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. तर बोंडअळी निरीक्षणाचा एक भाग म्हणून कृषी विभागही जिल्ह्य़ात साडेसतरा हजार सापळे बसविणार आहे. हे सापळे बसविण्यास सुरुवात झाल्याचे सांगण्यात आले. या सापळ्यात बोंडअळीच्या नर पतंगांना आकर्षित करण्यासाठी जिल्ह्य़ात जवळपास पावणेपाच लाख ‘ल्यूर’ लागणार आहे. एका सापळ्यात ठरावीक अंतराने तीन वेळेस ‘ल्यूर’ टाकण्याची गरज असते.  जिल्ह्य़ात सर्वाधिक ३२ हजार सापळे अंबड तालुक्यातील कापूस पिकाच्या क्षेत्रावर लागणे अपेक्षित आहे. त्याखालोखाल भोकरदन तालुक्यात २९ हजार कामगंध सापळे लावण्याचे नियोजन आहे.  याप्रमाणे अन्य काही तालुक्यांत कामगंध सापळे बसविण्याचे नियोजन आहे. गेल्या एप्रिल महिन्यापासूनच कृषी विभागाने या संदर्भात नियोजन करून कामगंध सापळ्याचे महत्त्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

गेल्या हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर झाला होता. या वर्षी कापूस उत्पादक जिल्ह्य़ात शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव काही प्रमाणावर रोखण्यासाठी कामगंध सापळे उपयोगी ठरू शकतात. शेतात लावलेल्या सापळ्यातील प्लास्टिक तुकडय़ास लावलेल्या गंधामुळे तेथे मादी पतंग असल्याचा भास निर्माण होऊन बोंडअळीच्या पूर्वावस्थेतील पतंग तिकडे आकर्षित होऊन जाळ्यात अडकतात. बोंडअळी एकाच प्रकारची नसते. आपल्याकडील बी. टी. कापसावर स्कोडो पेरा लुथरा बोंडअळीचा प्रादुर्भाव होता. कापसाच्या एक एकर क्षेत्रात चार ते पाच सापळे लावण्याची आवश्यकता असते. कृषी विभागाने पीक प्रात्यक्षिकाच्या वेळी या संदर्भात माहिती दिलेली आहे. सापळ्यात चार-पाच पतंग अडकले तर पिकास फवारणीची गरज असल्याचे शेतकऱ्यास समजते.   -ए. ए. शिंदे, कृषी कीटकशास्त्र अभ्यासक