प्रबोध देशपांडे

* विषाणू संशोधन आणि निदानासाठी सात ठिकाणी प्रतीक्षा

*..तर करोनाचे तात्काळ निदान झाले असते!

साथींचे आजार व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी उपाययोजना करण्याचा भाग म्हणून विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च अ‍ॅण्ड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) स्थापन करण्याला ऑक्टोबर २०१८ मध्ये राज्य मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली. मात्र, त्याच्या निधी वितरणास विलंब झाल्याने राज्यात दोन टप्प्यात मंजूर झालेल्या सात ठिकाणच्या प्रयोगशाळा उभारणीची प्रक्रिया तब्बल दीड वर्षांपासून रेंगाळली. विश्वव्यापी करोना संकटाचे वादळ राज्यात घोंघावू लागल्यानंतर त्या प्रयोगशाळा स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. वेळीच त्या प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्या असत्या तर राज्यात आणखी सात ठिकाणी करोनाचे तात्काळ निदान होणे शक्य झाले असते. शासनाच्या वेळकाढू धोरणाचा प्रयोगशाळा उभारणीलाही चांगलाच फटका बसला आहे.

विषाणूंपासून पसरणाऱ्या आजारांचा उद्रेक टाळून वेळीच निदान व उपचाराची अचूक दिशा ठरवण्यासाठी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे बाराव्या पंचवार्षिक योजनेंतर्गत प्रयोगशाळांचे जाळे निर्माण करण्याची योजना आहे. यामध्ये नागपूर येथे राज्यस्तरीय तर, वैद्यकीय महाविद्यालय पातळीवर अकोला, औरंगाबाद, धुळे आणि सोलापूर येथे ही प्रयोगशाळा उभारणीचा निर्णय झाला. लातूर आणि मिरज येथेही नंतर प्रयोगशाळा मंजूर करण्यात आली. या प्रयोगशाळांमुळे करोना, चिकनगुनिया, डेंग्यू, स्क्रब टायफस, स्वाइन फ्लू, मेंदूज्वर, एन्फ्लूएन्झा यासारख्या संसर्ग आजारांचे निदान करणे सहज शक्य होणार आहे.

नागपूर, अकोलासह पाच ठिकाणी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा स्थापन करण्यास व त्यानुषंगाने सामंजस्य करार करण्यास राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने ऑक्टोबर २०१८ मध्ये मान्यता दिली. त्यानंतर मिरज आणि लातूरचाही समावेश करण्यात आला. मंत्रिमंडळात मंजुरी होऊन तब्बल दीड वर्षांचा कालावधी उलटल्यावरही अद्यापही त्या प्रयोगशाळा स्थापन झाल्या नाहीत. त्यासाठीचा निधी प्रत्यक्षात एका वर्षांनंतर देण्यात आला. आता करोनाचा संसर्ग वाढत असल्याचे पाहून त्या प्रयोगशाळा स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला. त्यासाठी काही यंत्रसामुग्री वैद्यकीय महाविद्यालयांना पाठवण्यात आली आहे, तर उर्वरित यंत्र सामुग्री खरेदी करण्यासाठी हाफकीनमार्फत निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. संचारबंदी व बंदमुळे प्रयोगशाळा उभारणीत अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. उभारणी झाल्यावर पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेची अधिस्वीकृती मिळवावी लागेल. त्यामुळे त्या कार्यान्वित होण्यात आणखी काही दिवसांचा कालावधी जाणार आहे.

प्रयोगशाळेत हे कार्य होणार

* साथ पसरवणाऱ्याविषाणूंचा शोध घेणे

*   आजार निदान संच तयार करणे

*   उपाययोजना करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे

*   वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना प्रशिक्षण

*   विषाणूंबाबत संशोधन आणि अभ्यास

सध्या १२ ठिकाणी करोनाचे निदान

राज्यात सध्या शासनाच्या सात ठिकाणच्या केंद्रातून करोनाची लागण झाली अथवा नाही याचे निदान केले जात आहे. यामध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाच्या चार, तर इतर तीन प्रयोगशाळांचा समावेश आहे. खासगी पाच प्रयोगशाळांनाही मान्यता देण्यात आल्याने एकूण १२ ठिकाणी निदान होत आहे.

प्रयोगशाळा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू आहे. काही यंत्रसामुग्री पाठवण्यात आल्या. उर्वरित यंत्रसामुग्रीसाठी हाफकीनमार्फत निविदा काढण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन आठवडय़ांचा कलावधी दिला आहे. लवकरच त्या प्रयोगशाळा कार्यान्वित होतील.

– डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण संचालनालय.