सांगली : पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाने अखेरच्या क्षणी माघार घेत काँग्रेसचा मार्ग सुकर केला. सोनहिरा खोऱ्याचा आज जो विकास झाल्याचे दिसत आहे तो केवळ डॉ. पतंगराव कदम यांच्यामुळेच असे असल्याचे भासविण्याचा प्रयत्न काँग्रेसचा असला तरी डोंगराळ शेतीचा भाग ओलिताखाली आणण्यासाठी स्व. संपतराव देशमुख यांची आमदारकी युतीच्या काळात पणाला लावण्यात आली होती. आणि याच भांडवलावर आजअखेर या मतदारसंघात देशमुख-कदम यांच्यात राजकीय संघर्ष अगदी ग्रामपंचायतीपासून तेवत ठेवण्यात आला आहे. आता विश्वजित कदम यांना फारसा कालावधीही मिळणार नाही. जास्तीत जास्त आठ महिन्यांचा कालावधी मिळेल. विश्वजित कदम यांना आमदारकी मिळाली आहे. गड सहज हाती आला असला तरी तो टिकवणे त्यांना आव्हान असेल.

डॉ. कदम यांनी घरटी किमान एक तरी माणूस नोकरीला लावला. ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी तरुणांना नोकरीची संधी देण्याचा प्रयत्न केला. आज देशभर विस्तारलेले भारती विद्यापीठाचे जाळे हीच नोकरीसाठी पुंजी ठरली. याचा लाभ मतदारसंघातील प्रत्येक गावाला झाला आहे. आणि याच जोरावर डॉ. कदम यांनी सातत्याने विधानसभेचा सोपान सुलभ करण्याचा प्रयत्न केला.

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळीच पुढील निवडणूक मी काही लढविणार नाही. ही माझी अखेरचीच निवडणूक असेल असे सांगून भावनिक आवाहन करीत विजयाचा मार्ग सुकर केला होता. मात्र भाजपाच्या झंझावातात पलूस-कडेगावची जागा वगळता सर्वच ठिकाणी काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपाने पलूस आणि कडेगाव पंचायत समितीची सत्ता मिळवून कदम गटाला खिंडीत पकडण्याचे धोरण दर्शविले होते. जिल्हा परिषदेत काँग्रेसला सत्तेपासून दूर करण्यात भाजपाने यश मिळवीत असताना राष्ट्रवादीलाही रोखले. हा इतिहास आहे. यापासून काँग्रेसच्या मानसिकतेत फार बदल झाला असे म्हणणे धाडसाचे ठरेल. एकीकडे महापालिकेची सत्ता असतानाही तेथील कारभाराने पक्षाची प्रतिमा चांगली राहिली नाही. त्यात बदल करण्याची तयारी अद्याप दिसत नाही. या पोटनिवडणुकीत काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे कदमांचे राजकीय वारसदार म्हणून विश्वजित कदम यांना पुढे आणले आहे.  पोटनिवडणुकीत भाजपाने मात्र, हत्तीची अथवा उंटाची चाल न खेळता घोडय़ाची चाल खेळली आहे. पोटनिवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय लवकर घेतला नाही. पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली असली तरी अखेपर्यंत प्रदेश पातळीवरून होकार दिला नाही. अखेरच्या टप्प्यात उमेदवारी दाखल करण्याचे निर्देश प्रदेश पातळीवरून देण्यात आले. मात्र उमेदवारी देत असताना भाकरी पलटून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना पुढे केले.

भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष

भाजपाचे खासदार संजयकाका पाटील आणि जिल्हाध्यक्ष देशमुख यांच्यामध्ये अंतर्गत संघर्ष बऱ्याच वेळा उघड झाला आहे. या संघर्षांला मूळ कारण हे वालचंदच्या मालकी हक्काचे आहे. यामुळे खासदारांनी तासगाव कारखान्याच्या बदल्यात कदम गटाशी जुळते घेतले होते. अगदी विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मदत करण्यात हातचे काही न राखता भाजपाचे जास्तीत जास्त मतदान मोहनराव कदम यांनाच होईल याची खबरदारी त्यांनी घेतली. यातच खासदारांना दिल्लीची हवा मानवत नसल्याची वदंता आहेच. यामुळे त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेच्या जागेसाठी अगदी भाजपाचे असलेले अजितराव घोरपडे यांच्याशी सुप्त संघर्ष कायम राहील याची दक्षता घेतली आहे. कवठय़ात स्वत:चा गट निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यामुळे भाजपाचा खासदारपदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून जिल्हाध्यक्ष देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू झाली नसती तर नवल.

पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करीत असताना भाजपाने शक्तिप्रदर्शन करीत असताना कोणतीही कसर राहणार नाही याची दक्षता तर घेतलीच. अखेरच्या क्षणी अगदी उमेदवारी मागे घेण्यासाठी केवळ दहा मिनिटाचा अवधी उरला असताना भाजपाने उमेदवारी मागे घेतली. उमेदवारी मागे घेत असताना करण्यात आलेले समर्थन मात्र न पटणारे आहे. पालघरमध्ये काँग्रेसने माघार घ्यावी त्या बदल्यात पलूसमध्ये भाजपा माघार घेईल असा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र पालघरमध्येच भाजपाचे संभाव्य उमेदवार दिवंगत खासदार वनगा यांचे चिरंजीव शिवसेनेच्या बंधनात अडकल्याने काँग्रेसचे गावित यांना भाजपाचे उमेदवार म्हणून पुढे आणले.

एखादा आमदार अथवा खासदार दिवंगत झाला तर त्याठिकाणी त्यांच्या वारसाविरुद्ध उमेदवारी द्यायची नाही अशी महाराष्ट्राची राजकीय परंपरा असल्याचे सांगत भाजपाने पलूसची उमेदवारी मागे घेतली. वास्तविकता डॉ. कदम यांच्या निधनाने निर्माण झालेल्या भावनिक लाटेत उमेदवारीचे समर्थन करूनही मिळणारा कालावधी कमी असल्याने भाजपाने माघार घेत त्याला राजकीय परंपरेचा दाखला देण्याचा प्रयत्न चालविला आहे.