पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची वाताहत होत आहे, पण त्यावर आपण बोलू शकत नाही. पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी काँग्रेसने सध्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदम यांच्याकडे दिली आहे. यामुळे याबद्दल तेच अधिक बोलू शकतील अशी सारवासारव करण्याची वेळ वसंतदादा घराण्याचे वंशज आणि वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्यावर आज माध्यमांशी बोलताना आली.

पश्चिम महाराष्ट्रातील हर्षवर्धन पाटील, जयकुमार गोरे, आनंदराव पाटील, प्रकाश आवाडे, सदाशिव पाटील यांसारखे दिग्गज नेते पक्षाला रामाराम ठोकत आहेत. यातील काहींनी तर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षाची ही अशी वाताहत होत असताना पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष नेतृत्व शांत कसे? तसेच याबाबत वसंतदादा घराण्याला काय वाटते, असे विचारताच पाटील यांनी वरील उत्तर देत स्वत:ची सुटका करून घेतली.

पाटील म्हणाले, की अनेक दिग्गज नेते पक्षाला सोडून जात आहेत. याची कारणे आपल्याला माहीत नाहीत. पक्षाच्या या वाताहतीबद्दल आपण बोलूही शकणार नाही. खरेतर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी काँग्रेसने प्रदेश कार्याध्यक्ष आ. विश्वजित कदम यांच्याकडे दिली आहे. याबद्दल तेच अधिक बोलू शकतील. नेते पक्षाला का सोडून जात आहेत, यावर त्यांनी बोलले पाहिजे.

दरम्यान, भाजपचे सांगलीचे खासदार संजय पाटील यांच्यावरही टीका करताना पाटील म्हणाले, की खासदार विधानसभेसाठी पत्नीला उमेदवारी मागत घराणेशाही रुजवू पाहत आहेत. याच नेत्यांनी आमच्यावर घराणेशाहीचे आरोप केले होते. हे आता हास्यास्पद वाटत आहे. निवडणुकीवेळी माजी मंत्री अजितराव घोरपडेंना आमदारकीला मदत करण्याचा शब्द त्यांनी दिला होता. त्याचवेळी आपण घोरपडे यांना पूर्वसूचना दिली होती. आता तो प्रत्यय त्यांना येत आहे.