नाशिक : ‘कुटुंबीयांसह तुम्ही आमराईत यायचे. हवे तितके सेंद्रिय आंबे खायचे. निघताना जे आंबे खरेदी कराल, केवळ त्याचे पैसे द्यायचे.’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने आदिवासी शेतकरी मार्गक्रमण करीत आहेत. नाशिक-गुजरात महामार्गावर वसलेला पेठ हा आदिवासी तालुका. नागली, वरई, नाचणी, उडीद, भात, ज्वारी ही परिसरातील पारंपरिक पिके. आजवर ती घेऊन काही साध्य झाले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आता आमराईचा मार्ग धुंडाळला आहे. विशेष म्हणजे, आमराईसाठी नेहमीच्या पारंपरिक पद्धतीला छेद देत इस्रायलच्या धर्तीवर घन पद्धतीने लागवड करीत त्यांनी आंतरपिकांद्वारे अधिक अर्थार्जन करता येईल, याची तजवीज केली आहे.

नाशिक जिल्हा कांदा, द्राक्ष, डाळिंब आणि भात उत्पादनासाठी प्रामुख्याने ओळखला जातो. आदिवासीबहुल भागात भात आणि उपरोक्त पारंपरिक पिके वगळता वेगळा विचार होत नाही. त्यास पेठ तालुक्यातील सुमारे १०० हून अधिक आदिवासी शेतकरी छेद देण्याच्या प्रयत्नात आहेत. नाशिकपासून ६० किलोमीटरवर पेठ तालुका आहे. त्याला लागून गुजरात आहे. पलीकडच्या धरमपूर, बलसाड भागांत आंब्याचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्या ठिकाणी आंब्याचे मुबलक उत्पादन होते, तर आपल्याकडे का नाही, या विचारातून करंजाळी परिसरातील यशवंत गावंडे, पद्माकर गवळी, मिलिंद भोये, हेमराज भुसारे आदी शेतकऱ्यांनी अभ्यास केला. पेठ तालुक्यात गावरान आंब्याची कमतरता नाही; पण त्याला बाजारपेठ नाही. यामुळे शास्त्रशुद्ध पद्धतीने हापूस, केशरची लागवड केल्यास पारंपरिक पिकांऐवजी ते फायदेशीर ठरू शकते हे लक्षात आले.

तत्पूर्वी, गावंधपाडा येथील ४० शेतकऱ्यांनी श्रीमंत आदिवासी शेतकरी बचत गट, तर निरगुडेच्या ४० शेतकऱ्यांनी कृषिरत्न बचत गटाची स्थापना करीत सेंद्रिय शेतीला चालना दिली होती. त्याअंतर्गत काही शेतकऱ्यांनी विदर्भातील संशोधक सुभाष पाळेकर यांच्या शिबिरात प्रशिक्षण घेतले. गाईचे शेण, गोमूत्र, गूळ, डाळीचे पीठ, पाणी, माती यांच्या मिश्रणाचे जिवामृत आणि झाडांचा पालापाचोळा यांचा शेतांमध्ये वापर केला जात असल्याचे यशवंत गावंडे सांगतात. नैसर्गिक शेतीत मुख्य पिकासह तीन-चार आंतरपिके घेतली जातात. मुख्य पिकाच्या लागवडीचा खर्च उर्वरित पिकांतून वसूल व्हायला हवा असे हे समीकरण. त्यातून आंब्याच्या इस्रायलच्या घन पद्धतीने लागवडीचा विचार पुढे आला. पारंपरिक आंबा लागवड पद्धतीत एक एकरमध्ये फार तर ४० ते ६० झाडांची लागवड करता येते. घन पद्धतीने लागवड केल्यास एक एकरमध्ये तब्बल ७०० ते ८०० झाडे लावता येतात. दोन झाडांमधील अंतर पाच फुटांवर आणण्यात आले. दोन रांगांमधील जागेत लिंबू, चिकू किंवा पेरू यांसारखी फळपिके लावता येतात. तीन वर्षांत आंब्याचे झाड उत्पादन देऊ लागते. या झाडांची दरवर्षी छाटणी करून त्याचा आकार अधिक वाढणार नाही याची दक्षता घेतली जाते. एका झाडापासून ३० ते ४० किलो आंबा मिळाला तरी वार्षिक ८०० ते एक हजार रुपये उत्पन्न मिळते. पहिल्या वर्षी लागवडीचा अधिक खर्च असतो. नंतर केवळ देखभाल, धाटणी तसेच तत्सम कामांसाठी खर्च करावा लागतो. सर्व खर्च वजा जाता या पद्धतीने एकरी पाच ते सहा लाखांच्या उत्पन्नाचे शेतकऱ्यांचे गृहीतक आहे. आंतरपिकांद्वारे मिळणारे उत्पन्न वेगळेच. यशवंत गावंडे यांच्या प्रयोगानंतर शेकडो शेतकरी आंबा लागवडीकडे वळले आहेत.

यंदा उत्पादनात घट शक्य

स्थानिक पातळीवरील उत्साह पाहून कृषी विभागाने आंबा लागवडीसाठी असणाऱ्या योजनेत आदिवासी तालुक्यांचा समावेश केला. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी दीड लाख रुपये अनुदान मिळण्याची संधी आहे. पेठ तालुक्यातील शेतकरी सेंद्रिय आंबा लागवडीकडे वळत आहे. श्रीमंत, कृषिरत्न बचत गटांनी आधुनिक पद्धतीने लागवड केलेली आंब्याची झाडे दोन-तीन वर्षांची झाली आहेत. त्याद्वारे या वर्षी काही अंशी उत्पादन मिळेल. पुढील वर्षांपासून पूर्ण क्षमतेने उत्पादन हाती येईल. त्या वेळी आंब्यांनी बहरलेली आमराई शहरी भागातील नागरिकांना भ्रमंतीसाठी खुली केली जाणार असल्याचे गावंडे यांनी सांगितले. यंदा हवामानातील बदलामुळे मोहोर मोठय़ा प्रमाणात गळून गेला. त्यामुळे उत्पादनात ६० ते ७० टक्के घट होईल, याकडे परिसरातील शेतकरी लक्ष वेधतात.