कळंब येथील तहसील कार्यालयास बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी अचानकपणे भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व विभागांची कसून तपासणी करीत, नागरिकांची कामे वेळेवर करण्याबाबत सुनावले. जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक दिलेल्या या भेटीमुळे तहसीलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली.
कळंब येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील अनेक खेडय़ापाडय़ातील नागरिक शासकीय कामे घेऊन दररोज येतात.  गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांची कामे मोठय़ा प्रमाणात प्रलंबित असल्याने नागरिक दररोज तहसील कार्यालयात खेटे घालत आहेत.  कामे करून देतो असे सांगून भरपूर प्रमाणात पसा उकळणाऱ्या एजंटांची संख्याही वाढली आहे. पसे देणाऱ्यांचीच कामे एजंट वेळेवर करीत आहेत. अशा तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आल्यामुळे त्यांनी अचानक भेट दिली. या भेटीत त्यांनी संजय गांधी निराधार योजना, पुरवठा विभाग, रोजगार हमी योजना आदी सर्व विभागांची तपासणी केली. विविध विभागांमधील अनेक त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्या.
 जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांना तहसील कार्यालयात लोकांच्या कागदपत्रांच्या अनेक फाईल धुळखात पडल्याचे व त्यांची कामे विनाकारण रखडल्याचे दिसून आले. यावर त्यांनी ही प्रलंबित कामे १० दिवसांमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना तहसीलदार वैशाली पाटील यांना दिल्या आहेत.