’ विदर्भ-मराठवाडय़ातील वीटभट्टी शाळेचा पहिलाच प्रयोग ’ स्थलांतरित कामगारांच्या मुलांसाठी अभिनव उपक्रम

शिक्षणापासून दुरावलेल्या वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी अकोला जिल्ह्य़ातील बाळापूर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वीटभट्टी शाळा सुरू करण्यात आली आहे. वीटभट्टीवरील स्थलांतरित कामगारांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी विदर्भ-मराठवाडय़ातील वीटभट्टी शाळेचा पहिलाच अभिनव प्रयोग बाळापूर येथे करण्यात आला. शिक्षणाचा गंधही नसलेल्या या कामगारांची अनेक मुले आज या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

वीटभट्टी कामगार म्हणजे, समाजातील एक दुर्लक्षित घटक. वीटभट्टीवर काम करण्यासाठी संपूर्ण कुटुंबच स्थनांतरित होत असल्याने त्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. बाळापूर परिसरात सुमारे १०० वीटभट्टय़ा असल्याने येथील अर्थव्यवस्था त्यावरच आधारित आहे. ऑक्टोबर ते मे दरम्यान हे कामगार कुटुंबीयांसह वीटभट्टीवर, तर जून ते सप्टेंबरमध्ये आपापल्या मुळ गावी राहून शेतमजुरी करतात, त्यामुळे त्यांच्या मुलांची गावातील शाळेत कागदोपत्री नोंद असली तरी, ती वर्षभर शिक्षण घेऊ शकत नाही. यावर पर्याय म्हणून ठाणे जिल्ह्य़ात एकेकाळी सुरू असलेल्या भोंगा शाळा व पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यात सुरू असलेल्या साखर शाळांच्या धर्तीवर वीटभट्टी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी डॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धर्यवर्धन पुंडकर आणि श्री.दत्त वीट उद्योगाचे राजेंद्र धनोकार व दत्ताभाऊ धनोकार यांनी पुढाकार घेतला आणि बाळापूर येथील विदर्भ-मराठवाडय़ातील पहिली या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वीटभट्टी शाळा सुरू झाली. उद्घाटन मेळघाटातील समाजसेवक डॉ. रवींद्र कोल्हे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या शाळेसाठी राजेंद्र धनोकार व दत्ताभाऊ धनोकार यांनी जागा उपलब्ध करून देण्यासोबतच सक्रिय सहभागही घेतला आहे.

ऑक्टोबर ते मे दरम्यान दररोज सकाळी ८ ते १० यावेळेत या मुलांना शिक्षण दिले जाणार आहे. कागदोपत्री ज्या वर्गात या मुलांची नोंद असेल त्या वर्गाच्या संपूर्ण शिक्षणासह विद्यार्थ्यांचा पायापक्का करण्यावर भर राहणार आहे. त्यांना पुरक शिक्षण व व्यावहारिक ज्ञानही देण्यात येत आहे. पुंडकर महाविद्यालयातील प्राचार्यासह २५ प्राध्यापकांनी त्यांना शिकवण्याचा विढा उचलला. प्रत्येक प्राध्यापक महिन्यातून एक दिवस वर्ग घेत आहेत, त्यामुळे प्रत्येकाला आठ महिन्यात केवळ आठ वेळा वर्ग घ्यावे लागत असल्याने तेही मोठय़ा उत्साहाने या कार्यात सहभागी झाले आहेत. महाविद्यालयाचा शिक्षकेतर कर्मचारीही मुलांना शिक्षण देण्यात मागे नाही. शाळेतील उद्घाटनाच्या वेळी २१ मुलांना वह्य़ापुस्तक, दप्तरासह संपूर्ण शैक्षणिक साहित्य व गणवेश देण्यात आल्यामुळे या मुलांमध्ये उत्साह अधिकच संचारला. अवघ्या १० ते १२ दिवसांत या विद्यार्थ्यांना ए,बी,सी,डी व पाढे तोंडपाठ झाले आहेत. आपली मुले शिकत असल्याचे पाहून या कामगारांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आता ही शाळा निरंतर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘पैसा नको, सेवा हवी’

या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात निर्माण झालेला असल्याने याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. ठाणे जिल्ह्य़ात भोंगा शाळेचा प्रयोग व नंतर साखर शाळेचा प्रयोगही यशस्वी झाला. त्यांना शासनाचे पाठबळ मिळाले. त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे परीक्षण करून प्रमाणित करण्याचे अधिकार दिले होते. तसेच याही शाळेला शासनाने सहकार्य करून त्यांचे परीक्षण करावे व प्रमाणित करण्याचे अधिकार द्यावे, असे मत प्राचार्य डॉ.धर्यवर्धन पुंडकर यांनी व्यक्त केले. या शाळेसाठी आम्हाला अनुदानाची अपेक्षा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वीटभट्टी शाळेसाठी अनेकांचे मदतीचे हात समोर आले. पैशाच्या स्वरूपात मदत करण्याची तयारी अनेकांनी दाखवली. मात्र, ‘त्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा नको, तर त्यांना शिकवण्याची सेवा द्या’, अशी भूमिका वीटभट्टी शाळेच्या प्रशासनाने घेतली आहे.