गेले काही दिवस राज्यातील मंदिरं उघडण्याची मागणी सरकारकडे होत आहे. परंतु करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिक भाविकांसाठी बंदच ठेवण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनानं घेतला आहे. यासंदर्भात मंदिर व्यवस्थापनानं एक पत्रक काढलं आहे.

मंदिराचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी भाविकांच्या माहितीसाठी यासंदर्भातील पत्रक काढलं आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यासंदर्भात आज (मंगळवार) एक बैठक घेतली. त्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. करोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून अनेक स्तरांतून मंदिरं आणि अन्य धार्मिक स्थळं उघडण्याची मागणी जोर धरु लागली आहे. आता अनलॉकचा चौथा टप्पा सुरू झाला असला तरी धार्मिक स्थळं आणि शाळा महाविद्यालंय बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. तर दुसरीकडे राज्यातील लॉकडाउनही ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मंदिर समितीनंही ३० सप्टेंबरपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.