आज देशभरात ७० वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा आज सर्वत्र उत्साह असताना पंढरपुरातील विठ्ठल मंदिरही यामध्ये मागे राहिलेलं नाही. ठिकठिकाणी ध्वजारोहण करत एकमेकांना शुभेच्छा देत प्रजासत्ताक दिन साजरा केला जात विठ्ठल मंदिरही तिरंगी फुलात सजवण्यात आलं आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मंदिर समितीने विठ्ठल मंदिराला तिरंगी फुलांची आकर्षक सजावट केली आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त विठुरायालादेखील तिरंगी रंगात नटवण्यात आलं आहे. विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यासह, चौखांबी व सोळखांबीमध्येही तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. यामुळे मंदिरात येणाऱ्या भक्तांना विठुरायाचं दर्शन घेताना प्रजासत्ताक दिनाचाही अनुभव घेण्यास मिळत आहे.

देशभरात ७० वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असून दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यानंतर भारताच्या लष्करी सामर्थ्य आणि संस्कृतीची झलकच राजपथावर अनुभवायला मिळाली. या सोहळ्यात दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा हे प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दिल्लीत विजय चौक येथून संचलनाला सुरुवात झाली. राजपथ, टिळक मार्ग, बहादूर शाह झफर मार्ग, नेताजी सुभाष मार्ग मार्गे लाल किल्ला येथे परेडची सांगता झाली. सुमारे ९० मिनिटांचा हा शानदार सोहळा असेल. यात २२ राज्यांचे चित्ररथ आणि केंद्र सरकारच्या विविध विभागांचे चित्ररथ सहभागी झाले होते.