|| मंदार लोहोकरे

समितीच्या उत्पन्नात वाढ, ६ लाख ९५ हजार भाविकांकडून दर्शन

अधिक मासानिमित्त विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी भरभरून दान दिले आहे. १६ मे ते १३ जून या कालावधीत जवळपास २ कोटी ३२ लाख ५१ हजार ९२४ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. तर, या महिन्याच्या कालावधीत ६ लाख ९५ हजार भाविकांनी पदस्पर्श दर्शन, तर ९ लाख ७५ हजार भाविकांनी मुख दर्शन घेतल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. यापूर्वीच्या अधिक महिन्यात मंदिर समितीला २ कोटी ५ लाख ३७ हजार ७५१ इतके उत्पन्न मिळाले होते. त्या तुलनेत यंदा मंदिर समितीच्या उत्पन्नात २७ लाखांची वाढ झाली आहे.

यंदा मराठी महिन्यात एक महिना जास्तीचा आला होता. अधिक मास अर्थात पुरुषोत्तम मास असे म्हटले जाते. १६ मे ते १३ जून या महिन्याच्या कालावधीत राज्यासह इतर राज्यांतून भाविक दर्शनाला आले होते. या पाश्र्वभूमीवर मंदिर प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती. देवाचे पदस्पर्श दर्शन रांगेत भाविकांना ऊन, पाऊ स याचा त्रास होऊ नये म्हणून शेडनेट उभारण्यात आले आहे. तर पायाला चटके बसू नये म्हणून मॅटिंग बसविण्यात आले आहे. तसेच आळंदी येथील विश्व सामाजिक संस्थेतर्फे दर्शन रांगेतील भाविकांना मोफत शुद्ध पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले होते. या पाश्र्वभूमीवर अधिक महिन्यात मंदिर समितीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.

अधिक महिन्यात झालेल्या दानधर्मात श्री विठ्ठलाच्या पायावर ३४,७३,८५१ तर, रुक्मिणी मातेच्या पायावर ९,६३,५०७ रुपये एवढे दान प्राप्त झाले आहे. याशिवाय अन्नछत्र देणगी १,६९,७४७, पावती स्वरूपातील देणगी ६६,२३,८७३ इतके रुपये समितीला मिळाले आहेत. बुंदी लाडू विक्री ३२०५७४०, राजगिरा लाडू विक्री ३,७८,९००, फोटो विक्री ६२,२००, नित्यपूजा ४,००,०००  इतके उत्पन्न समितीला मिळाले आहे. या सह अन्य स्वरूपात १०,२५,८१३ असे एकूण मिळून २,०५,३७,७५१ इतके उत्पन्न मंदिर समितीला या अधिक महिन्यात प्राप्त झाल्याची ढोले यांनी माहिती दिली. तीन वर्षांपूर्वी  झालेल्या अधिक महिन्यात मंदिर समितीला २,०५,३७,७५१ इतके उत्पन्न मिळाले होते. या तुलनेत यंदाच्या अधिक महिन्यात मंदिर समितीला अधिक उत्पन्न म्हणजे तब्बल २७ लाखांची वाढ झाली आहे. अधिकस्य अधिक फलम असे म्हटले जाते. त्याप्रमाणे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला अधिक महिन्यात अधिक उत्पन्न मिळाले आहे.