सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर येणाऱ्या प्रत्येक कॉलचे संभाषण अत्याधुनिक संगणकीय प्रणालीत रेकॉर्ड केले जाणार आहे. यात प्रत्येक कॉलचे क्रमांक, दिनांक व वेळेची नोंद ठेवली जाणार आहे. रेकार्ड कॉल तत्काळ ऐकून तक्रारींच्या निवारणासाठी हे कॉल संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या मोबाइलवर ऐकविण्यासाठी पाठविण्यात येतात.
या पाश्र्वभूमीवर शहर पोलीस नियंत्रण कक्षात १०० तसेच महिलांच्या तक्रारीच्या निवारणासाठी १०९१ या टोल फ्री दूरध्वनीवर संपर्क साधून तक्रारीची माहिती द्यायची आहे. संगणकीय प्रणालीमध्ये टोल फ्री कॉल केल्यानंतर प्रथम संदेश ऐकविण्यात येईल. बीप असा आवाज ऐकल्यानंतर नागरिकांनी किंवा महिलांनी त्यांची तक्रार नोंदवायची आहे. या टोल फ्री क्रमांकावर येणाऱ्या प्रत्येक कॉलचे क्रमांक, दिनांक व वेळेची नोंद ठेवली जाणार आहे. रेकॉर्ड झालेले प्रत्येक कॉल संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मोबाइलवर आणि पोलीस ठाण्याच्या दूरध्वनीवर ऐकविण्यासाठी पाठविण्यात येतो. तसेच कॉल डिटेल्स समजण्यासाठी कॉलर आयडीही पुरविण्यात येतो. त्याचवेळी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदविणाऱ्या संबंधित त्यांची तक्रार नोंद झाल्याचा एसएमएस पाठविण्यात येतो. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण झाल्यानंतर संबंधित पोलीस ठाणे किंवा प्रभारी पोलीस अधिकाऱ्याकडून माहिती भरण्यात येते. तक्रारींचे निवारण झाल्यानंतर संबंधित तक्रारदार व्यक्तीला तसा एसएमएस पाठविला जातो.
संगणकामध्ये नोंद झालेल्या कोणत्याही कालावधीचे तक्रारीचे कॉल पुन्हा ऐकता येतात किंवा त्याची पुन्हा पडताळणी करता येऊ शकते. मुंबईनंतर प्रथमच सोलापूरच्या पोलीस नियंत्रण कक्षात व्हाईस कॉलिंग सुविधा सुरू झाली आहे.