सोलापूर जिल्ह्य़ातील विधानसभेच्या ११ जागांच्या मतमोजणीची जय्यत तयारी निवडणूक प्रशासनाने केली असून त्यासाठी कडेकोट पोलीस सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. दुपारी दोनपर्यंत सर्व निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. सर्वात पहिला निकाल माळशिरस राखीव मतदारसंघाचा तर सर्वात शेवटचा निकाल अक्कलकोटचा जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीत यंदा जिल्ह्य़ात बहुतांश मतदारसंघांमध्ये अटीतटीच्या लढती झाल्या आहेत. विशेषत: सोलापूर शहर मध्य, सोलापूर दक्षिण, माढा, पंढरपूर, करमाळा, मोहोळ राखीव या जागांच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे. माळशिरसच्या निकालाबाबतही उत्कंठा आहे.
जिल्ह्य़ात ३२ लाख १६५४ मतदारांपैकी २१ लाख ५२ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाची टक्केवारी ६७.२२ इतकी असून मागील २००९ च्या विधानसभेपेक्षा ५ टक्के जास्त तसेच लोकसभा निवडणुकीपेक्षा ९.२१ टक्के जास्त मतदान झाले आहे. लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीत जास्त मतदान होणाऱ्या जिल्ह्य़ामध्ये सोलापूर जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर आला आहे. पहिल्या क्रमांकावर सातारा (१०.५७ टक्के) तर तृतीय स्थानावर पुणे जिल्हा (८.१९ टक्के) आल्याची माहिती निवडणूक अधिकारी श्रीपती मोरे यांनी दिली.
सोलापूर शहर मध्य, शहर उत्तर व सोलापूर दक्षिण या तिन्ही मतदारसंघांतील मतमोजणी उद्या रविवारी सकाळी आठ वाजता रामवाडी येथील शासकीय धान्य गोदामात सुरू होणार आहे. तर उर्वरित सर्व ८ जागांची मतमोजणी ज्या त्या मतदारसंघातील तालुकास्तरावर होणार आहे. सर्व ११ जागांच्या मतमोजणीसाठी ७०४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतमोजणीसाठी मतदारसंघनिहाय टेबल लावण्यात येत असून मतमोजणीच्या किमान १६ तर कमाल २६ फेऱ्या होणार आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी फेरीनिहाय निकाल जाहीर केला जाणार असून मतदारसंघनिहाय होणाऱ्या फेऱ्यांची संख्या अशी: करमाळा-२३, माढा-२४, बार्शी-२३, मोहोळ-२४, सोलापूर शहर मध्य-१९, सोलापूर शहर उत्तर-१९, सोलापूर दक्षिण-२१, पंढरपूर-२१, सांगोला-२० व माळशिरस-१६. मतमोजणीची पहिली फेरी पोस्टल मतांची असेल. त्यानंतर प्रत्येक मतमोजणीच्या फेरीसाठी सुमारे २० ते २५ मिनिटांचा वेळ लागणार आहे. पहिल्या तीन-चार तासांत निकालाचा कल स्पष्ट होणार असून संपूर्ण निकाल हाती येण्यासाठी सुमारे सहा तासांचा कालावधी अपेक्षित आहे.
निवडणूक मतमोजणीच्यावेळी शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मतमोजणीच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोलापूरच्या रामवाडी शासकीय धान्य गोदाम परिसरात सुमारे एक हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच शहरातील संवेदनशील भागातही पोलीस बंदोबस्त राहणार आहे. अक्कलकोट, माढा, करमाळा, पंढरपूर-मंगळवेढा, माळशिरस, मोहोळ, बार्शी आदी सर्वच भागात पोलिसांबरोबर निमलष्करी दलाचे जवानही नजर ठेवणार आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ात येत्या ३० ऑक्टोबपर्यंत जमावबंदी तथा शस्त्रबंदीचा कायदा लागू करण्यात आला आहे.
उत्सुकता शिगेला!
वार्ताहर, सांगली
खुल जा सिम सिम करीत आज विधानसभ निवडणुकीच्या पेटाऱ्यातील निकाल जाहीर होणार असून सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ होत आहे. सकाळी नऊ वाजता पहिली फेरी जाहीर होणार असून त्यानंतर तासाभरात कल कोणता हे स्पष्ट होणार आहे. तब्बल १०७ उमेदवार असणाऱ्या आठ मतदार संघांमधील निकालाबाबत जिल्ह्यात कमालीची उत्सुकता पाहण्यास मिळत आहे.
मतमोजणीची प्राथमिक तयारी प्रशासनाने पूर्ण केली असून मतमोजणीसाठी ८५० कर्मचारी नियुक्त केले आहेत. या कर्मचाऱ्यांना सकाळी ६ वाजेपर्यंत मतमोजणीच्या ठिकाणी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. १९ ते २४ फेऱ्यांमध्ये उमेदवारांना मिळालेली मते ध्वनिक्षेपकावरून जाहीर केली जाणार आहेत. सांगली व मिरज मतदार संघाची मतमोजणी वखार महामंडळाच्या गोदामात होणार असून प्रवेशद्वारापासून मतमोजणीचे स्थळ सुमारे दोन किलो मीटर आहे.
निवडणूक निकालानंतर कोणताही प्रसंग उद्भवल्यास कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचे पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी सांगितले. निकालानंतर मिरवणूक काढण्यास प्रतिबंध करण्यात आला असून संवेदनशील ठिकाणी तत्पूर्वीच पोलिसांची कुमक रवाना करण्यात येणार आहे.