सरकारच्या धोरणात गरीब, दलित, अल्पसंख्यांक, शेतकरी, व्यापारी यांना स्थान राहिलेल नाही. भाजप सरकारला सत्तेतून घालवायचे असेल तर विरोधीपक्षातील मत विभाजन थांबवायला हवे असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

ते अलिबाग येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. मोदी लाट असूनही २०१४ च्या निवडणुकी भाजपला ३१ टक्के मत पडली. म्हणजेच देशातील ६९ टक्के लोकांनी भाजप विरोधात मतदान केले. मात्र विरोधीपक्षांच्या मतविभाजनाचा फायदा भाजपला झाला. यापुढील काळात जर भाजपला रोखायचे असेल तर लहान मोठ्या पक्षांनी एकत्र घेऊन आगामी निवडणुक लढवली गेली पाहिजे, त्यासाठी सरकारविरोधात वातावरण निर्मिती केली गेली पाहिजे, यामुळे काही ठिकाणी पक्षाला कमी पणा घ्यायची वेळ येऊ शकेल पण सत्ता आली तर परिस्थिती नक्की बदलेल असा विश्वासही चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

खोटी आश्वासने देऊन भाजप सरकारमध्ये आले. दिलेली आश्वासने पाळली नाही. विकासाची आश्वासने देऊन सत्तेत आले आणि आता विकासच विसरले. इंदु मिल मधील बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, अरबी समुद्रातील शिवछत्रपतींचे स्मारक, कोस्टल रोड, शिवडी न्हावा शेवा सििलक, मुंबई गोवा महामार्गाचे काय झाले. साडे तीन वर्ष झाली एकतरी प्रकल्प मार्गी लागला का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. संमृध्दी मार्ग सोडला तर मुख्यमंत्र्यांना काहीच दिसत नाही. पण त्या प्रकल्पाचा कोणाला फायदा होणार हे ते सांगत नाहीत. अंधळ दळतय आणि कुत्र पिठ खातय अशी राज्यसरकारची गत असल्याची घणाघाती टिका त्यांनी यावेळी केली.

मेक ईन महाराष्ट्र फसला आहे आता मॅगनॅटीक महाराष्ट्राची स्वप्न दाखवली जात आहे. गुजरात आणि जपान मधील निवडणुका लक्षात घेऊन १ लाख १० हजार कोटी रुपयांचा बुलेट ट्रेन प्रकल्प देशावर लादण्यात आला आहे. तर दुसरीकडे २ कोटी ७० लाख रेल्वे प्रवाश्यांच्या सुरक्षा वारयावर सोडण्यात आली आहे. दरवर्षी १४ हजार लोक देशात रेल्वे अपघातात मरतात. पण या रेल्वे प्रवाश्यांच्या सुरक्षिततेपेक्षा सरकारला बुलेट ट्रेनचे महत्व अधिक असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. काँग्रेस आणि विरोधीपक्ष नेत्यांच्या फाईली काढायच्या आणि त्यांना गप्प करायचे हा भाजपचा अजेंडा आहे.

राज्यातील माझी मुख्यमंत्र्यांना फाईल तंत्राचा वापर करून काँग्रेस मधून बाहेर पडण्यास भाग पाडले गेले. आज त्यांचे काय झाले हे सर्वासमोर आले आहे असा टोला त्यांनी नारायण राणे यांचे नाव न घेता लगावला. प्रफुल्ल पटेलांनी गुजरात मध्ये ६० उमेदवार उभे केले नसते तर गुजरातचे चित्र वेगळे असते, त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हे उमेदवार उभे केले हा संशोधनाचा मुद्दा असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

 काँग्रेस कार्यकर्त्यांची खंत

मेळाव्याच्या सुरवातीलाच महेंद्र घरत आणि माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी पक्षांतर्गत तक्रारींचा पाढा वाचला. स्थानिक परिस्थिती लक्षात न घेता वरीष्ठ पातळीवर निर्णय घेतले जातात. त्याची पक्षाला मोठी किंमत चुकवावी लागते. शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुळे पक्षाचे जिल्ह्यातील अस्तित्व धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीतही पक्ष टिकवून ठेवण्याचे काम निष्ठावान कार्यकर्त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांना बळ द्या वरीष्ठ पातळीवर निर्णय घेतांना आमच मत जाणून घ्या, आघाडी सरकारच्या काळात पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना वारयावर सोडले गेल्याची खंत या दोघांनी व्यक्त केली. त्यावर उत्तर देत्तांना पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना धीर धरण्याचा सल्ला दिला, सत्ता आली तर झालेली चुक सुधारली जाईल अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.