रायगड जिल्ह्य़ात निवडणूक विभागातर्फे राबवल्या  जाणाऱ्या मतदार नोंदणी अभियानाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर आली आहे . शासकीय सर्वेक्षणानुसार जिल्ह्य़ात १८ ते १९ वयोगटातील जवळपास १ लाख युवक युवतींनी आपली मतदार यादीत नोंदणी केलेली नाही . दुसरीकडे स्थलांतरीत मतदार आपली मतदार यादीतील नावे वगळण्यास इच्छुाक नसल्याचे निदर्शनास आले आहे .

रायगड जिल्ह्य़ात २३ लाख ७०१ मतदारांमध्ये व अपंग मतदारांची संख्या ८ हजार ७८९ इतकी आहे . १८ ते  १९ वयोगटातील २८ हजार ५७४  मतदार आहेत तर २० ते २९ वयोगटातील मतदारांची संख्या ४ लाख ३४ हजार ७८७ इतकी आहे.

निवडणूक विभागाकडून मतदार नोंदणी वाढवण्यासाठी वेगवेगळया उपाययोजना केल्या जातात. जनजागृती मोहीम राबवली जाते. युवा मतदारांचे प्रमाण वाढवण्यासाठी शाळा तसेच महाविद्यालय स्तरावर निवडणूक साक्षरता क्लब, चुनाव पाठशाळा स्थापन करण्यात आले आहेत. शिवाय मतदार नोंदणी साक्षरता दिंडी काढली जाते. महिला मतदारांचे प्रमाण वाढवण्यासाठी स्वीपसारखा कार्यक्रम राबवला जातो. परंतु जिल्ह्य़ात नवमतदार नोंदणीला मिळणारा प्रतिसाद खूपच कमी आहे. निवडणूक विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्य़ात जवळपास १ लाख नवीन मतदार आहेत. त्यातील किमान ५४ हजार मतदारांची नोंदणी होणे अपेक्षित आहे. परंतु तसा प्रतिसाद मिळत नाही. दुसरीकडे स्थलांतरीत मतदार आपली नावे स्व तहून मतदार यादीतून कमी करत नाहीत. पूर्वी ही नावे संबंधित अधिकारी कमी करत असत. परंतु आता ते अधिकार कमी करण्यात आले आहेत. अशा मतदारांची यादी राज्य निवडणूक आयोगाला पाठवली जाते. आयोगाच्या  परवानगीनंतरच ही नावे मतदार यादीतून कमी केली जातात .

रायगड जिल्ह्य़ात आता मतदार याद्यांच्या पुर्नीक्षण करण्यात येत आहे. यात नवीन मतदार नोंदणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे . त्यानुसार १ जानेवारी २०२१ रोजी ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झालेले असेल अशा व्यक्तींना मतदार यादीत आपले नाव नोंदवता येणार आहे.  त्यानुसार जुनी मतदार यादी १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. १५  डिसेंबर पर्यंत या यादीवरील दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील . नवीन मतदार नोंदणी किंवा नावे वगळणे, दुबार नावे कमी करणे, पत्ता बदलणे यासाठी ५ व ६ डिसेंबर तसेच १२ व १३ डिसेंबर रोजी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.  १४  जानेवारी पर्यंत यादीची तपासणी, अद्यावतीकरण, छपाई करून १५ जानेवारीपर्यंत अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती जिल्हार निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी दिली .

मतदार याद्यांच्या  पुर्नीक्षण मोहीमेचा कार्यक्रम सुरू झाला आहे. मतदार याद्या अद्यावत, अचूक व्हाव्यात तसेच जास्तीतजास्त. पात्र मतदारांची नावे मतदार यादीत यावीत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. नागरिकांनीदेखील यात सहकार्य करावे. आपली तसेच आपल्याल नातेवाईकांची नावे यादीत योग्य पद्धतीने नोंदवली गेली आहेत किंवा नाही याची खात्री करून घ्यावी.

–  निधी चौधरी, जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड</p>

जिल्ह्य़ातील मतदार

पुरूष –                ११ लाख ७१ हजार २२१

महिला –              ११ लाख २९ हजार ४७५

तृतीयपंथी-           ५

एकूण मतदार – २३ लाख ७०१