मतदार नोंदणीसाठी रविवारी राबविण्यात आलेल्या विशेष अभियानास नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाशिक शहरातील अनेक केंद्रांवर नवमतदारांची प्रचंड गर्दी उसळल्याने नमुना क्रमांक ६ अर्ज संपुष्टात आले. त्यामुळे झेरॉक्स प्रती काढून यंत्रणेला वेळ भागवावी लागली.  नाशिक जिल्ह्यात ४,१९१ मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी अभियान पार पडले. सकाळपासून बहुतेक केंद्रांवर मतदार नोंदणीसाठी युवक व युवतींच्या रांगा लागल्या होत्या. शहरातील अनेक केंद्रांवर दुपारी नोंदणीसाठी नमुना क्रमांक ६ चे अर्ज संपुष्टात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना झेरॉक्स प्रती काढून काम सुरू ठेवावे लागले. या अभियानाची चांगली प्रसिद्धी झाल्यामुळे त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी सांगितले. या दिवशी हजारोंच्या संख्येने अर्ज संकलित झाले आहेत. सर्व केंद्रांवरील अर्ज एकत्रित झाल्यावर अंतिम आकडा निश्चित होईल. लोकसभा निवडणुकीस मतदान करण्यास उत्सुक असलेल्या तरुण व तरुणींनी या दिवशी आपले नाव मतदान यादीत समाविष्ट करण्यासाठी चांगलीच धावपळ केल्याचे पाहावयास मिळाले. नावनोंदणीसाठी अर्ज क्रमांक ६ भरताना दोन छायाचित्रे, रहिवासी पुरावा व जन्मतारखेचा दाखला ही कागदपत्रे संकलित करण्यात आली. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही नवमतदारांनी नावनोंदणीला प्राधान्य दिले. नाशिकसह धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यात या अभियानास चांगला प्रतिसाद मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ही प्रक्रिया १५ मार्चपर्यंत सुरू राहणार असल्याचे निवडणूक यंत्रणेकडून सांगण्यात आले; परंतु पुढील पाच दिवसांत नवमतदारांना हे अर्ज निवडणूक यंत्रणेने विधानसभा मतदारसंघनिहाय स्थापन केलेल्या मदत केंद्रावर जमा करावे लागतील.