शेतीच्या पाण्यासाठी गेल्या ६० वर्षांपासून दुष्काळी भागातील जनतेला संघर्ष करावा लागत आहे. १५ वर्षांपूर्वी युतीच्या शासन काळात मंजूर झालेल्या टेंभू-म्हैसाळ उपसा सिंचन योजना अद्यापि पूर्ण झाल्या नाहीत. या योजना पूर्ण न करता सत्ताकारणातील घराणेशाही मजबूत करण्याकडे सत्ताधाऱ्यांचा कल दिसतो. ही घराणेशाही संपविण्यासाठी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भूमिका बजवावी, असे आवाहन माढा लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार सदाशिव खोत यांनी केले.
सांगोला तालुक्यातील वासूद येथे गावभेटी व मतदारांशी संवाद साधण्यासाठी खोत यांनी दौरा केला. त्या वेळी त्यांनी सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांना पाणी न देणारे हे सरकार शेतकऱ्यांच्या उसाला व अन्य पिकांना हमीभावही देत नाही. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आंदोलने करावी लागली. त्यामुळे चिडून आम्हाला तुरुंगात पाठविण्यात आले. त्याची पर्वा आपण कधीही केली नाही, असे ते म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला जादा भाव मिळाला, हा आमचा विजय आहे. शेतकरी सुखी होऊ नये, त्याच्या खिशात जादा चार पैसे येऊ नयेत व तो नेहमीच लाचारीचे व हालअपेष्टांचे जीवन जगावा हेच सत्ताधाऱ्यांचे राजकारण आहे, असा आरोप खोत यांनी केला. या वेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जयंत बगाडे यांच्यासह भाजपचे शिवाजीराव गायकवाड, शिवसेनेचे कमरोद्दीन खतीब आदींचा या गावभेटीत सहभाग होता.