मोदींना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतानाच मतदारांनी गद्दाराला व त्यांची पाठराखण करणाऱ्या मंत्र्यांना धडा शिकवला, अशा तिखट शब्दांत शिर्डी मतदारसंघातील शिवसेनेचे विजयी उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली.
विजयानंतर पत्रकारांशी बोलताना लोखंडे म्हणाले, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी विश्वासाने उमेदवारी दिली, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले. सर्व पक्षातील मोठय़ा नेत्यांनी नाही, पण खालच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मदत केली. पंधरा वर्षे आमदार म्हणून काम केले. जिल्हा बँकेचे संचालकपद भूषवले, त्याचा फायदा झाला. लोकांनी विश्वास टाकला. उमेदवारी मिळवून देण्यापासून आमदार अशोक काळे यांनी प्रयत्न केले. त्यांनी पाणीप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई केली. त्यामुळे लोकांनी मला मतदान केले. माझ्या विजयात सर्वाचाच सहभाग आहे. विरोधी उमेदवार हे एका नेत्याचे होते, पण मी सर्वाचा होतो. त्यामुळे मोठा विजय मिळाला.
लोखंडे यांच्या विजयात मोठा वाटा असलेले आमदार काळे यांनी वाकचौरे यांच्यावर येथे बोलताना टीका केली. वाकचौरे हे गद्दार होते. त्यांनी साईबाबांना फसवले, खोटी शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांनाही फसवले. त्यामुळे लोकांनी त्यांना घरी पाठवले. खासदारकीच्या काळात केवळ पैसे कमावण्याचा धंदा वाकचौरे यांनी केला, असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसचे उमेदवार मावळते खासदार वाकचौरे पाचव्या फेरीपर्यंत मतमोजणी केंद्रात उपस्थित होते, मात्र त्यांनी निकालावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.