उस्मानाबादचा भावी खासदार कोण, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या निकालाने घडय़ाळाची टिकटिक, तसेच धनुष्यबाणाचा आवेग वाढला आहे! शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील चार सभागृहांत १४ टेबलवर मतमोजणीच्या २७ फेऱ्या होतील. खासदार कोण, याचे उत्तर १६ मे रोजी दुपारी तीनपर्यंत मिळू शकेल.
सात वेळा विधानसभा, एकदा लोकसभा अशी अनभिषिक्त सत्ता भोगणारे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, तसेच शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड या दोन तुल्यबळांमध्ये यंदा चांगलीच लढत रंगली. आपापल्या परीने दोन्ही पक्षांचे कार्यकत्रे आम्हीच विजयी होणार, असा दावा करीत आहेत. घोडामदान जवळ आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे. सहा विधानसभा मतदारसंघांतील एकूण १ हजार ९७१ केंद्रांवर झालेल्या मतदानातील मतांची मोजणी करण्यासाठी ७०० कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गालगत शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील वेगवेगळय़ा चार सभागृहांमध्ये एकाच वेळी मतमोजणी सुरू होईल. सुरुवातीला टपालाच्या मतांची मोजणी केली जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीस प्रारंभ होईल. म्हणजे एका वेळी १४ मतदान केंद्रांवरील मशिनमध्ये बंदिस्त झालेल्या मतांची मोजणी करण्यात येणार आहे. मतदारसंघातील बूथच्या संख्येनुसार मतमोजणीच्या फेऱ्या होतील. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३७० मतदान केंद्रे असल्यामुळे या मतदारसंघात मतमोजणीच्या २७ फेऱ्या होतील, तर औसा व उमरगा मतदारसंघांतील टेबलवर एकूण २२ फेऱ्या होणार आहेत. परंडा व उस्मानाबाद मतदारसंघांतील मतदान केंद्रावरील मशिनमध्ये बंद असलेल्या मतांची मोजणी २५ फेऱ्यांमध्ये पूर्ण होईल, तर बार्शी मतदारसंघातील ३०९ मतदान केंद्रांवरील मतमोजणीच्या २३ फेऱ्या होणार आहेत. फेऱ्यांची संख्या कमी-अधिक असली, तरी १४ टेबलवर ही मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.
एक फेरी पूर्ण होण्यास किमान २० ते २५ मिनिटांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतमोजणीसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांचा चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था त्याच ठिकाणी केली जाणार आहे. उमेदवार, उमेदवार प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधीच्या जेवणाचा खर्च मात्र उमेदवारास करावा लागणार आहे. प्रशासनाने भोजन व्यवस्थेसाठी नेमलेल्या ठेकेदाराकडे राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या १०० प्रतिनिधींच्या जेवण, चहा व नाश्त्यासाठी ९ हजार ८०० रुपयांचा धनादेश जमा केला.