औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी उद्या (२० जून) मतदान होणार आहे. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतरची ही निवडणूक असल्याने त्याच्या निकालाविषयी कमालीची उत्सुकता आहे. सतीश चव्हाण व शिरीष बोराळकर यांच्यात सरळ लढत होईल, असे मानले जाते. निवडणुकीसाठी आवश्यक ते सर्व साहित्य आठही जिल्हय़ांतील ६०९ मतदान केंद्रांवर गुरुवारी रात्रीपर्यंत पोहोचविण्यात आले होते. पसंती क्रमांकानुसार मतदान करताना एकाच भाषेत पसंतीचा अंक लिहावा. पसंती क्रमांक देताना उमेदवाराच्या समोर तो ठसठशीतपणे दिसेल असे मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल यांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीतील मोदी लाटेनंतर सामाजिक संकेतस्थळावरून होणाऱ्या प्रचाराला आलेले महत्त्व लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी त्या माध्यमांचाही प्रचारात उपयोग केला. भाजपचे शिरीष बोराळकर यांनी वैयक्तिक गाठीभेटी व सामाजिक संकेतस्थळावरून त्यांची बाजू मतदारांसमोर मांडली. या मतदारसंघात २३ उमेदवार रिंगणात आहेत. ३ लाख ७९ हजारांहून अधिक मतदारांनी या निवडणुकीसाठी नोंदणी केलेली आहे. उद्या मतदान करताना पदवीधरांनी कोणती काळजी घ्यावी, याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. ते म्हणाले, मराठी, हिंदी, इंग्रजी अथवा रोमन अंकातही पसंतीने मतदान करता येईल. मात्र, मतदान करताना एकच भाषा वापरली जावी. उमेदवारासमोर पसंती क्रमांक नोंदवताना मतदान केंद्रावर देण्यात येणाऱ्या पेनचा उपयोग करावा. एका पेनच्या शाईने एक पसंती क्रमांक व दुसऱ्या पेनने दुसरा पसंती क्रमांक असे मतदान करू नये, असेही ते म्हणाले. या निवडणुकीत पहिल्यांदाच नकाराधिकार हा विकल्पही असल्याने त्याचा वापरही करताना अनेक प्रकारची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ‘नोटा’समोर बरोबर किंवा चूक यासाठी वापरले जाणारे चिन्ह वैध मानले जाईल. पसंती क्रमांक देऊन जर ‘नोटा’च्या समोर काही नोंद असल्यास ते मत अवैध ठरेल. मतदाराची ओळख मतदानाच्या माध्यमातून दिसेल, अशी चिन्हे, ठसे आढळून आल्यास ते मतही बाद ठरविण्यात येणार आहे. अक्षरी लिहिलेल्या पसंती क्रमांकाचे मतही अवैध मानले जाईल. अंकात किंवा अक्षरात एकत्रितपणे मतदान करता येणार नाही. शासकीय कर्मचाऱ्यांना व पदवीधरांना मतदानासाठी चार तासांची सुटीही देण्यात आली असून मतदानादिवशी मद्यविक्रीलाही बंदी घालण्यात आली आहे. ६०९ मतदान केंद्रांमुळे सूक्ष्म निरीक्षक व व्हिडीओ कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
औरंगाबाद आणि लातूर या दोन जिल्हय़ांत अधिक मतदारसंख्या असल्याने या मतदारांचा कौल विजयी उमेदवार ठरवेल, असा अंदाज आहे. कोणत्या मतदारसंघात कोणाला आघाडी मिळेल, याविषयीची चर्चा सुरू झाली आहे. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची दक्षता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे.