प्रतिष्ठेची लढाई कोण जिंकणार?

पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मंगळवारी मतदान होत आहे. राज्यात शिवसेना-भाजप युतीमध्ये फूट पडल्यानंतर होणाऱ्या पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शिवसेना व भाजप यांच्यापैकी बलाढय़ कोण हे ठरवण्यासाठी ही निवडणूक दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पालघर भागात भाजप आपले अस्तित्व टिकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी या पक्षांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ पैकी तीन जागी बिनविरोध निवड झाल्याने ५४ ठिकाणी तसेच पंचायत समितीच्या ११२ गणांसाठी मतदान होणार आहे. १,३१२ मतदान केंद्रांवर मतदान होत असून जिल्ह्यामध्ये १० लाख २४ हजार ८८८ मतदार आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासन सज्ज आहे. सोमवारी जिल्ह्यात तालुकानिहाय ईव्हीएम यंत्र आणि इतर मतदान साहित्याचे मतदान कर्मचाऱ्यांना वितरण करण्यात आले असून मतदान कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रांवर मतदानासाठी आवश्यक व्यवस्थापन पूर्ण केले आहे.

या निवडणुकीच्या कार्यक्रमात पालघर जिल्ह्यात प्रचाराकरिता अवघे सहा दिवस मिळाल्याने अधिकतर प्रचार थंड राहिला. उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेण्यास प्राधान्य दिले. भाजपतर्फे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील यांनी प्रचारासाठी विविध ठिकाणी दौरे व सभा घेतल्या. शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, राष्ट्रवादीतर्फे जितेंद्र आव्हाड यांनी जिल्ह्याच्या विविध भागात दौरे केले. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी जिल्ह्यातील विविध भागात पैसेवाटप केल्याची चर्चा आहे.

भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून शिवसेनेपेक्षा जिल्ह्यात वर्चस्व निर्माण करण्यासाठी वेगवेगळी रणनीती आखल्याचे दिसून आले आहे.

काही तालुक्यांमध्ये बहुजन विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर आघाडी झाल्याचे दिसून आले असले तरी जिल्हास्तरीय कोणतीही अधिकृत आघाडी झाले नसल्याचे चित्र या निवडणुकीत दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक मुद्दय़ांवर निवडणूक अधिकतर लढली जात असून अधिकतर होणाऱ्या तिरंगी व चौरंगी लढतीमध्ये होणाऱ्या मतविभागणीचा लाभ कोणाला मिळतो हे ८ जानेवारी रोजी निवडणुकीच्या निकालादरम्यान समोर येणार आहे. या निवडणुकीत प्रचार अधिकतर स्थानिक पातळीवर राहिल्याने निवडणुकीकरिता आवश्यक वातावरण निर्माण झाले नसल्याचे दिसून येत आहे.

उमेदवारांचा खर्च माफक

या निवडणुकीत जिल्हा परिषद उमेदवारांना चार लाख तर पंचायत समिती उमेदवारांना तीन लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा होती. मात्र प्रचाराकरिता मिळालेला कमी अवधी तसेच आवश्यक परवानग्या घेण्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने उमेदवाराने मतदारसंघामध्ये मोजके बॅनर लावल्याचे दिसून आले. कमी उमेदवारांनी रिक्षा व ध्वनिक्षेपकाचा वापर करून प्रचार केल्याचे दिसून आले. खर्च करण्याची मुभा असतानाही अनेक उमेदवारांचा माफक खर्च केला.

निवडणूक कर्मचाऱ्याचा मृत्यू

या निवडणुकीत टेन विभागाचे क्षेत्रीय अधिकारी विजय सुतार यांनी अंतिम प्रशिक्षण घेतल्यानंतर निवडणूक कामामध्ये कार्यरत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सुतार कुटुंबीयांना शासकीय मदत मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची माहिती पालघरचे उपविभागीय अधिकारी विकास गजरे यांनी दिली.