जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी शांततेत मतदान; संध्याकाळी मतदानाची टक्केवारी वाढली

पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुका तसेच आठ पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मंगळवारी शांततेत मतदान झाले. सकाळी मतदारांचा निरुत्साह दिसून आला असला तरी दुपारनंतर मतदानामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. सकाळी ११नंतर मतदानकेंद्रांवर मतदारांची संख्या वाढत गेली. मात्र दुपारनंतर मतदानामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.

जिल्ह्यातील ५४ जिल्हा परिषदेच्या जागांसाठी तसेच आठ पंचायत समितीच्या ११२ जागांसाठी निवडणूक होत असून जिल्हा परिषदेसाठी २१३ उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी मतदानाला संथ गतीने सुरुवात झाली. सकाळी ९.३० वाजेपर्यंत केवळ ९.६९ टक्के मतदान झाले. दोन तासांत त्यात किंचतशी वाढ होऊन सकाळी ११.३० वाजता २०.०४ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. दुपारनंतर मतदान घराबाहेर पडत असल्याचे चित्र दिसून आले. दुपारी १.३० वाजेपर्यंत ४०.०५ आणि ३.३० वाजेपर्यंत ५२.९५ टक्के मतदान झाले. अनेक मतदानकेंद्रांवर सकाळच्या प्रहरी शुकशुकाट होता. मात्र दुपारी मतदार घराबाहेर पडले आणि मतदानाची टक्केवारी वाढत गेली.

पालघर जिल्हा निर्मितीनंतर २०१५मध्ये पहिल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत ६३.९६ टक्के मतदान झाले होते.

अचानक घोषित झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांदरम्यान प्रचाराकरिता फक्त सहा दिवसांचा अवधी उपलब्ध झाला होता. त्यामुळे या निवडणुकीसाठी आवश्यक वातावरणनिर्मिती झाली नसल्याचे दिसून आले. निवडणुकीसाठी अनेक आस्थापनानी दोन ते तीन तासांची सवलत दिल्याने तसेच मुंबई व गुजरात राज्यांत नोकरीनिमित्त जाणाऱ्या कामगार वर्गाला सवलत मिळाली नसल्याने मतदानावर परिणाम झाला. लांबलेला पाऊस आणि चक्रीवादळामुळे मासेमारीचा हंगाम विस्कळीत झाले असल्याने निवडणूक असतानाही आपल्या रोजीरोटीसाठी मासेमारी बोटी खोल समुद्रात गेल्या होत्या. शहरी व सागरी भागातून अनेक पदयात्री देवदर्शनाला गेल्याने या सगळ्यांचा परिणाम मतदानावर झाल्याचे दिसून आले. पालघर जिल्ह्यातील अनेक नागरिक रोजगारासाठी स्थलांतर करताता. त्याचाही परिणाम मतदानावर झाल्याचे दिसून आले.

दुपारी ३.३० वाजेपर्यंत वसई तालुक्यात ४९.९३ टक्के मतदान झाले. डहाणू तालुक्यात ५०.२१, पालघर तालुक्यात ४९.०६, तलासरी तालुक्यात ५८.३३, जव्हार तालुक्यात ५९.३५, मोखाडा तालुक्यात ५८.५८, वाडा तालुक्यात ५४.९४ आणि विक्रमगड तालुक्यात ६०.८२ टक्के मतदान झाले. आदिवासीबहुल विक्रमगड तालुक्यात अधिक मतदान झाल्याचे दिसून आले.

मतमोजणीची तयारी पूर्ण

जिल्ह्यात पालघर तालुका व्यतिरिक्त इतर सर्व ठिकाणी पंचायत समितीच्या गणनिहाय मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बुधवार, ८ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणारी मतमोजणी आठ ते दहा फेऱ्यांनंतर सुमारे एक ते दीड तासांत संपण्याची शक्यता आहे. पालघर तालुक्याची मतमोजणी बोईसर येथील टीमा हॉलमध्ये होणार असून याठिकाणी जागेची मर्यादा असल्याने जिल्हा परिषद गटनिहाय १७ मतमोजणी टेबल मांडण्यात आले आहेत. पालघरची मतमोजणी दोन टप्प्यात गणनिहाय होणार असून पालघरचा निकाल इतर तालुक्यांच्या तुलनेत काहीसा विलंब घोषित होण्याची शक्यता आहे.

मतदानासाठी इंग्लंडहून बोईसरमध्ये

पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडमध्ये गेलेली रिया शुक्ला ही तरुण पहिल्यांदाच मतदान करण्याचा अधिकार बजावण्यासाठी बोईसरमध्ये आली. जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात रिया भारतात येणार होती. मात्र प्रथमच मतदान करण्याची संधी मिळणार असल्याने ती ६ जानेवारीलाच भारतात आली. बोईसरमधील खरेपाडा गटामध्ये तिने आपला मतदानाचा हक्क बजावला.

वसई तालुक्यात उत्साहात मतदान

वसई पंचायत समितीच्या निवडणुकीत मंगळवारी शांततापूर्ण वातावरणात मतदान झाले. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली तेव्हापासून मोठय़ा संख्येने मतदारांनी मतदान केंद्रात हजेरी लावली होती. यामध्ये युवा मतदारांपासून ते वयोवृद्ध नागरिकांनीही मोठय़ा उत्साहात मतदान केले.