रायगडच्या चिरगाव जंगलात संख्या वाढली; वनविभागाच्या मदतीने ‘सीस्केप’च्या प्रयत्नाला यश

काळाच्या ओघात गिधाड हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी कोकणात मुबलक प्रमाणात आढळणारा हा पक्षी दुर्मीळ होत चालला आहे. ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्ह्य़ातील चिरगाव येथे गिधाडसंवर्धन हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. सीस्केप संस्था आणि वनविभागाच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या प्रकल्पाचे आता सकारात्मक परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे.

एकेकाळी कोकणात गिधाड मोठय़ा प्रमाणात आढळून येत असत. मात्र १९९२ ते २००७ या कालखंडात कोकणातील गिधाडांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून आले. वाढते शहरीकरण आणि कुपोषण ही या मागची प्रमुख कारणे होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आशिया खंडात अत्यंत दुर्मीळ समजली जाणारी पांढऱ्या पाठीची गिधाडे कोकणात अजूनही आढळून येतात. त्यामुळे या गिधाडांचे संवर्धन करणे अत्यंत गरजेच आहे. ही बाब लक्षात घेऊन, सीस्केप संस्था आणि वनविभाग यांच्या सहकार्यातून म्हसळा तालुक्यातील चिरगाव जंगलात गिधाडसंवर्धन प्रकल्प राबविला जात आहे.

कुपोषणामुळे दगावणाऱ्या गिधाडांचे संवर्धन करणे आणि गिधाडांचा नसíगक अधिवास वाढवणे हा या प्रकल्पामागचा मूळ उद्देश आहे. म्हसळा तालुक्यातील चिरगाव आणि श्रीवर्धन तालुक्यातील जासवली येथील जंगलात गिधाडसंवर्धन प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. यातील चिरगाव येथील प्रकल्पांचे सकारात्मक परिणाम आता दिसून यायला लागले आहेत. पुर्वी ज्या परिसरात गिधाडांची एखाद् दुसरी घरटी दिसून येत होती. तिथे आज ३० ते ३५ गिधाडांची घरटी पाहायला मिळत आहेत. या परिसरातील संख्या ८० हून अधिक झाली आहे. तर श्रीवर्धन म्हसळ्यातील आसपासच्या परिसरातही गिधाडांची संख्या वाढीस लागली आहे. आज देशाविदेशातील पक्षीनिरीक्षकांसाठी चिरगावचा गिधाडसंवर्धन प्रकल्प हा महत्त्वाचे अभ्यास केंद्र ठरत आहे.

कुपोषण ही गिधाडांची संख्या कमी होण्यामागचे मूळ कारण होते. त्यामुळे गिधाडांचे कुपोषण रोखणे गरजेच होते. पुर्वीच्या काळात गावाबाहेर मृत जनावरे टाकण्यासाठी ढोरटाकी असायची. मात्र ग्रामस्वच्छता अभियानाची सुरुवात झाल्यानंतर ढोरटाक्या बंद झाल्या. मृत जनावरांना पुरणे अनिवार्य झाले. त्यामुळे गिधाडांचे कुपोषण मात्र वाढले. गिधाडांची संख्या कमी होत गेली.

स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने गावात ढोरटाकी संकल्पना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनी ढोरटाकीवर आणून टाकलेली जनावरे संस्थेच्या माध्यमातून जंगलात नेऊन टाकण्यास सुरुवात केली. यामुळे गिधांडांचे कुपोषण कमी झाले. आणि त्यांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. महाड आणि श्रीवर्धनमधील वन्यप्रेमी आणि निसर्गप्रेमींनी या कामासाठी आíथक मदत उपलब्ध करून दिली. त्यामुळे गिधाडसंवर्धनाला पाठबळ मिळाले.

मृत जनावरांच्या विघटन प्रक्रियेत गिधाड महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांना निसर्गाचे सफाई कामगार म्हणून ओळखले जाते, मात्र वाढत्या शहरीकरणामुळे गिधाडांची संख्या आज झपाटय़ाने कमी होत आहे. आशिया खंडात प्रामुख्याने लांब चोचीची, बारीक चोचीची आणि पांढऱ्या पाठीची गिधाडे आढळत असत. यातील पांढऱ्या पाठीची गिधाडे जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ही गिधाडे कोकणात अजूनही काही प्रमाणात आढळतात.

काही वर्षांपूर्वी पक्षीनिरीक्षक प्रेमसागर मिस्त्री यांना म्हसळा तालुक्यातील देहेन येथे गिधाडांची काही घरटी आढळून आली होती. मात्र येथील गिधाडांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे स्थानिकांनी त्यांना सांगितले. यानंतर वनविभागाचे अधिकारी आणि स्थानिकांच्या मदतीने या परिसरात गिधाडसंवर्धन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

गिधाडसंवर्धनासाठी दर वर्षी शासनस्तरावर मोठा खर्च केला जातो. हरियाणा पश्चिम बंगाल आणि आसाम येथे गिधाडसंवर्धन केंद्र राबविले जातात. पण कोकणात जिथे नसíगक गिधाडांचा अधिवास आढळतो तिथे मात्र गिधाडसंवर्धनाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. गिधाडांचा नसíगक अधिवास वाढवला आणि कुपोषण दूर केले, स्थानिकांमध्ये त्यांच्याबद्दल जागृती निर्माण केली तर याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.     – प्रेमसागर मेस्त्री, प्रकल्प संचालक, सीस्केप, गिधाडसंवर्धन प्रकल्प