वसई-विरार पालिकेचा अजब निर्णय; दीड महिन्याचे वेतनही थकवले

विरार : करोना संकटात लढण्यासाठी कामावर घेतलेल्या आरोग्य विभागातील ८० कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय वसई-विरार महानगरपालिका आयुक्तांनी घेतला आहे. गेला दीड महिना या कर्मचाऱ्यांना ठरलेला पगारही देण्यात आला नसल्याचे बोलले जात आहे.  कामावरून कमी करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये आया आणि कक्ष परिचर (वॉर्ड बॉय) आदींचा समावेश आहे.

करोना काळात अधिक कर्मचार्म्यांची गरज लक्षात घेऊन पालिकेने ठेका पद्धतीने विविध कर्मचारी आरोग्य विभागात भरती केले होते. अलगीकरण केंद्र आणि महापालिका रुग्णालयात दीड महिन्यापूर्वी मुलाखती घेवून ठेका पद्धतीने ८० हून अधिक कर्मचारी कामावर घेतले होते. त्यांना पालिकेच्या म्हाडा अलागीकरण केंद्र, रिद्धीविनायक रुग्णालय आणि अग्रवाल करोना केंद्रात कामासाठी ठेवले होते. परंतु, आता अचानक आयुक्तांनी २६ मे रोजी एक पत्र काढून या कामगारांना १ जूनपासून कामावर न येण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे या कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे.   या संदर्भात माहिती देताना ठेका परिचारिका पौर्णिमा गायकवाड यांनी माहिती दिली की, जेव्हा महापालिकेला गरज होती की, तेव्हा आम्हाला राबवून घेतले. आम्ही जीव धोक्यात घालून काम केले आणि आता अचानक आम्हाला कामावरून काढून टाकत असतील तर आम्ही काय करायचे? ठेकेदारानेदेखील हात वर केले आहे. यामुळे तक्रार कुणाकडे करायची हा प्रश्न निर्माण झाल्याचे त्या म्हणाल्या.

‘कर्मचारी तयार नव्हते’

या कर्मचाऱ्यांचे मुकादम समीर जाधव यांनी सांगितले, की पालिका कर्मचारी ‘कोविड’ कक्षात  काम करण्यास नकार देत होते. अशावेळी आमचे सर्व कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत होते.  पण आता पालिका अशा प्रकारे आमच्यावर अन्याय करत आहेत.

सध्या महापालिकेला त्या कर्मचाऱ्यांची गरज नाही. सफाई  विभागातील पालिका कर्मचारी त्यांची जागा घेतील. यामुळे पालिकेवरील अतिरिक्त आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.   

– रमेश मनाळे, पालिका अतिरिक्त आयुक्त