News Flash

प्रकल्प, योजनांचा संकल्प

वसईत खोलसापाडा धरण पाणीयोजना, परिवहन सेवेचा शुभारंभ

वसईत खोलसापाडा धरण पाणीयोजना, परिवहन सेवेचा शुभारंभ

वसई : २०२० या वर्षांत करोनाच्या संकटामुळे आलेली मरगळ झटकून वसई-विरार महापालिका नव्या जोमाने कामाला लागली आहे. २०२१ या नव्या वर्षांत शहरातील नारिकांना विविध योजनांच्या भेटी देण्याचा निर्धार पालिकेने केला आहे.  घनकचरा प्रकल्प, नव्याने परिवहन सेवा, बहुचर्चित खोलसापाडा धरणाच्या योजनेचा शुभारंभ नवीन वर्षांत केला जाणार आहे. अमृत योजना आणि ६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनादेखील पूर्ण केली जाणार असल्याचे पालिकेने सांगितले.

नागरिकांसाठी वसई- विरार महापालिकेने विविध योजनांची घोषणा केली होती. काही योजना सुरू झाल्या होत्या. मात्र २०२० वर्षांच्या सुरुवातीला करोनाचे संकट आले आणि सर्व योजना रखडल्या. निधी आणि कामगारांची टंचाई भेडसावू लागली होती. पालिकेची यंत्रणा करोना निवारण्याच्या कामात व्यस्त होती. पालिकेचे आयुक्त गंगाथरन डी यांनी रखडलेल्या सर्व योजनांचा आढावा घेतला आणि त्या पूर्ण करण्याचे आदेश दिले. नवीन वर्षांत वसई-विरारमधील नागरिकांना अधिकाअधिक सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे नवीन वर्षांत पालिकेने नागरिकांना विविध योजनांच्या भेटी देण्याचे ठरवले आहे, असे त्यांनी सांगितले.

४३ मार्गावर बससेवा

करोनाच्या टाळेबंदीच्या काळात परिवहन सेवा ठप्प झाली होती. ती सेवा सुरू करण्यासाठी ठेकेदार सक्षम नसल्याने पालिकेने ठेकेदाराची सेवा बडतर्फ केली होती. आता नवीन ठेकेदार नेमण्यात आले असून नव्याने परिवहन सेवा सुरू केली जाणार आहे. त्यासाठी पहिल्या १३ बसेस शहरात आल्या आहेत. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात या बसेसना हिरवा कंदील दाखवून शुभारंभ केला जाणार आहे. एकूण ४३ मार्गावर ही बससेवा सुरू केली जाणार आहे. सर्व बसेस अत्याधुनिका आणि प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव देणाऱ्या असतील असे परिवहन सभापती प्रीतेश पाटील यांनी सांगितले.

दररोज १५ दशलक्ष लिटर्स पाणी

* बहुचर्चित खोलसापाडा पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ जानेवारी महिन्यात केला जाणार आहे. वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी लक्षात घेऊन पालिकेने खोलसापाडा धरण विकसित करण्याचा निर्णयम् घेतला होता. लघुपाटबंधारे खात्यामार्फत ही पाणीपुरवठा योजना राबवली जाणार आहे. या कामाचा एकूण खर्च ५१ कोटी रुपये एवढा आहे.

* या खोलसापाडा धरणातून पालिकेला दररोज १५ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होणार आहे. वसई-विरार शहरापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. शहराला सर्वात जवळ असणारे हे धरण आहे. खोलसापाडा धरणाच्या टप्पा २ ला लागणारा निधी वसई- विरार महापालिका देणार असून हे धरण संपुर्ण पालिकेच्या मालकीचे असणार आहे.

* याबरोबर शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजनेचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे आयुक्त गंगाथरन डी यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत १८ जलकुंभ उभारणे तसेच ३८४ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम रखडले होते. त्यामुळे नवीन ठेकेदार नेमून कामाला गती देण्यात आली आहे.

*  ६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून ते काम देखील लवकरच पूर्ण  केले जाणार आहे.  नवीन वर्षांत या गावातील नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागणार नाही, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प 

सध्या शहरात कचराभूमीची सर्वात मोठी समस्या आहे. मागील अनेक वर्षांपासून पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंद पडला आहे. पालिकेने या वर्षांंत हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लास्टिक बंदी असली तरी शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. त्यासाठी पालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या विरोधात व्यापक मोहीम सुरू करण्याचा निर्णयम् घेतला आहे.

नवीन वर्ष वसई -विरारच्या नागरिकांना अधिकाअधिक सुखसुविधा मिळवून देणारे ठरणार आहे. घनकचरा प्रकल्प, पाणीपुरवठा, परिवहन सेवा अशा अनेक योजना पूर्ण करत आहोत. शहर प्लास्टिकमुक्त व्हावे, यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली जाणार आहे.

गंगाथरन डी., आयुक्त वसई विरार महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 1:18 am

Web Title: vvmc gifts various schemes to citizen of city in new year zws 70
Next Stories
1 उदरनिर्वाहासाठी पुन्हा सोडून जातो गाव..
2 रस्त्यावर बेकायदा उभ्या वाहनांचा अडथळा दूर
3 विकासनिधी वितरणात समन्वय
Just Now!
X