News Flash

बेकायदा तबेल्यांमुळे जलस्रोत प्रदूषित

वसई-विरार महापालिकेकडून ८५ तबेलाचालकांना नोटिसा

वसई-विरार महापालिकेकडून ८५ तबेलाचालकांना नोटिसा

विरार : वसई-विरार परिसरांत बेकायदा वसलेल्या तबेल्यांमुळे आसपासच्या परिसरांतील नाले आणि जलस्रोत पूर्णत: दूषित झाले आहेत. याशिवाय परिसरातील नागरिकांचे आरोग्यदेखील धोक्यात आले आहे. पालिकेने ८५ तबेलाचालकांना नोटिसा बजावल्या आहेत.

वसई पूर्वच्या कामण आणि वसई पूर्वेच्या वालीव परिसरात मुंबईहून स्थलांतरित झालेले शेकडो तबेल अनेक वर्षांपासून बेकायदा बिनदिक्कत सुरू आहेत. या भागात दोनशेहून अधिक तबेले आहेत. या तबेल्यांवर महाराष्ट्र प्रदूषण मंडळ तसेच वसई-विरार महापालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे या परिसरात अनधिकृत तबेल्यांचे प्रमाण वाढत गेले.

या परिसरात असलेल्या मोठय़ा नैसर्गिक नाल्याशेजारी हे तबले वसले आहेत. या तबेल्यातून निघणारे मलमूत्र कोणतीही प्रक्रिया न करता सरळ नाल्यात सोडले जात आहे. यामुळे हे नाले प्रदूषित झाले आहेत. तसेच वर्षांनुवर्षे जनावरांचे मलमूत्र साठत असल्याने नाल्यांचे पात्र अरुंद झाले असल्याने पावसाळ्यात या परिसराला पुराचा सामना करावा लागतो. तसेच पावसाळ्यात या नाल्याचे पाणी स्थनिक जलस्रोतात जाऊन या परिसरातील विहिरी, बावखल, पाणवठे प्रदूषित झाले आहेत.

मुख्य म्हणजे येथील कामण नदी पूर्णत: प्रदूषित झाली असून तिचे गटारात रूपांतर झाले आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तबेलाधारक शासनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवून बिनदिक्कत मलमूत्र नाल्यात सोडत आहेत. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. प्रशासनाच्या नाक्कावर टिचून तबेलाधारक नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत.

पालिकेने मात्र कारवाई करत असल्याचे सांगितले आहे. महापालिका मुख्य आरोग्य निरीक्षक सुखदेव दरवेशी यांनी माहिती दिली. नागरिकांच्या तक्रारीवरून पालिकेकडून या तबेल्यांवर कारवाई सुरू आहे. सध्या ८५ तबेलाधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. तबेलाधारकांनी मलमूत्र बाहेर न सोडता परिसरात गोबरगॅसचा प्लांट बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच सर्व तबेल्यांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

 

वसई-विरार परिसरात नैसर्गिक नाल्याशेजारी हे तबले वसले आहेत. या तबेल्यातून निघणारे मलमूत्र कोणतीही प्रक्रिया न करता सरळ नाल्यात सोडले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 3:07 am

Web Title: vvmc issue notice to 85 illegal buffalo stables for polluting water sources zws 70
Next Stories
1 ४१ लाखांची वीजचोरी
2 महाडमध्ये करोनाचे चौदा नवे रुग्ण
3 रायगडातील १०६ गावांत दरड कोसळण्याची भीती
Just Now!
X