वसई-विरार पालिकेच्या नालेसफाई, पाणीपुरवठा विभागाच्या देखभाल-दुरुस्ती कामांतून ठेकेदारांना नारळ

सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई : वसई-विरार महापालिकेतील अनावश्यक खर्चात कपात करणाऱ्या आयुक्तांनी आता पालिकेची आर्थिक लूट करणाऱ्या ठेकेदारांना देखभाल-दुरुस्ती कामांतून बाजूला करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील नालेसफाई आणि पाणीपुरवठा विभागाची देखभाल-दुरूस्ती यापुढे ठेकेदारांमार्फत न करता पालिका स्वत: करणार आहे. नालेसफाईसाठी पालिकेने स्वत:ची यंत्रसामग्री मागविण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. यामुळे पालिकेची वार्षिक कोटय़वधी रुपयांची आर्थिक बचत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वसई-विरार महापालिका आयुक्त गंगाधरन डी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अतिरिक्त कायम कर्मचाऱ्यांना विविध विभागात कामे देणे, अतिरिक्त ठेका कर्मचारी कमी करण्यास सुरवात केली. पालिकेची अनेक कामे ही ठेकेदारांमार्फत केली जातात. यात ठेकेदार अधिक कामगार नेमतात. त्यांचा वाढीव खर्च दाखवून पालिकेला देयके सादर केली जातात.  यातून पालिकेचा मोठा खर्च होत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यामुळे ठेकेदारांमार्फत कामे न करता पालिकेने ती स्वत:कडे घेतल्यास आर्थिक बचत होईल, असा दावा करण्यात आला. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला नालेसफाई, पाणी पुरवठय़ाची मासिक देखभाल दुरूस्ती पालिका कर्मचाऱ्यांमार्फत करण्याचा निर्णय घेतला.

यासाठी दोन मोठय़ा बूमचे पोकलेन,  दोन जेसीबी आणि छोटा पोकलेन विकत घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. याबाबत माहिती देताना प्रभारी साहाय्यक आयुक्त विश्वनाथ  तळेकर यांनी सांगितले की,  पालिकेच्या मालकीची यंत्रसामग्री असल्यास नियमित नालेसफाई केली जाईल. नालेसफाईचे काम संपल्यानंतर ही यंत्रसामग्री अनधिकृत बांधकामे पाडण्याच्या कामात  वापरली जातील. यात पालिकेच्या निधीची बचत होईल.

ऑक्टोबरपासून आरंभ

पाणीपुरवठा खात्यातही आयुक्तांनी महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यात जलवाहिन्या आणि इतर यंत्रणाची  देखभाल ठेकेदारांऐवजी पालिका स्वत: करणार आहे.  १ ऑक्टोबरपासून पालिकेचा पाणीपुरवठा विभाग कामाला सुरुवात करणार आहे.

पालिकेकडे स्वत:ची यंत्रणा आणि मनुष्यबळ आहे. त्यामुळे काही कामांसाठी ठेकेदारांची आवश्यकता नाही. पालिका तिजोरीवरील ताण त्यामुळे हलका होणार आहे. याशिवाय दर्जेदार काम होणार आहे.

-गंगाथरन डी. आयुक्त, वसई विरार शहर महापालिका