नदीकाठची कचराभूमी हलविण्याची मागणी

वाडा :  वाडा शहराला कचराभूमीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका खासगी जागेत वाडा नगरपंचायतीने कचराभूमी तयार केली आहे. मात्र त्यातील दूषित पाणी हे नदीपात्रात उतरत असल्याने नदीतील पाणी दूषित होत आहे. त्यामुळे ही कचराभूमी बंद करावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे नगरपंचायतीसमोर जमा झालेल्या कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न उभा राहिला आहे.

वाडा-भिवंडी या महामार्गालगत गांध्रे येथे यापूर्वी असलेल्या कचराभूमीला तीव्र विरोध झाल्याने ही कचराभूमी उमरोठे रोडकडे हालविण्यात आली. तेथील नागरिकांनीही तीव्र विरोध केल्यानंतर ही कचराभूमी वाडा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सिद्धेश्वर बंधारानजीक एका शेतकऱ्याची जमीन भाडय़ाने घेऊन या ठिकाणी सुरू केली. या कचराभूमीतील दूषित पाणी, घाण नदीपात्रात उतरत असून वाडय़ातील ग्रामस्थांना याच जलाशयातून पाणी पुरवठा केला जात आहे.  या नदीपात्रातील पाणी या नदीकाठच्या ऐनशेत, तुसे, गांध्रे या तीन ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील पाच हजार नागरिकांना होत आहे.  वाडा नगरपंचायतीकडून वाडा शहराला होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेची पाणी फिल्टर व्यवस्था नादुरुस्त असल्याने पावसाळ्यात येथील नागरिकांना गढूळ पाणीपुरवठा होत आहे. आता येथील कचराभूमीमुळे दूषित पाणी प्यावे लागणार असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या कचराभूमीविरोधात अनेकांनी आवाज उठवला. येथील गावदेवी मित्र मंडळाच्या सदस्यांनी तीव्र आंदोलन छेडले होते. यावेळी ही कचराभूमी पावसाळ्यापूर्वी इतरत्र हलविण्यात येईल असे आश्वासन नगरपंचायत प्रशासनाने दिले होते. मात्र पावसाळा सुरू झाला तरी ही कचराभूमी येथेच सुरू आहे.

परवानगीची पूर्तता नसल्याने प्रकल्प रखडला

वाडा नगरपंचायतीच्या कचराभूमीसाठी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी वनखात्याकडून एक हेक्टर जमीन सहा महिन्यांपूर्वीच मिळवून दिली आहे. मात्र नगरपंचायत प्रशासन व येथील पदाधिकाऱ्यांनी  गेल्या सहा महिन्यांत घनकचरा व्यवस्थापन समिती कल्याण व पाटबंधारे विभाग पालघर यांच्याकडून आवश्यक लागणाऱ्या परवानगीची पूर्तता न केल्यामुळे हा कचराभूमीचा प्रकल्प सुरू करता आलेला नाही.