वाडा नगरपंचायतीची कचराभूमीसाठीची साद प्रतिसादाविना

रमेश पाटील, लोकसत्ता

वाडा : वाडा नगरपंचायतीच्या कचराभूमीची समस्या गेल्या तीन वर्षांपासून सुटलेली नाही. ‘भाडे तत्त्वावर द्या, नाहीतर विकत द्या, पण कुणीतरी जागा उपलब्ध करून द्या!’ अशी आर्त साद वाडा नगरपंचायतीमधील प्रशासन, लोकप्रतिनिधी गेल्या तीन वर्षांपासून वन विभागाकडे, खाजगी जागा मालकांना घालत आहेत. मात्र आजतागायत या हाकेला कुणी दाद देत नसल्याने येथील कचराभूमीची समस्या गंभीर बनत चालली आहे. आता तर हा कचरा रस्त्यावर येऊ लागल्याने प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.

वाडा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील ओला व सुका कचरा उचलण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या घंटागाडय़ांचा भ्रष्टाचाराचा विषय चर्चेला उधाण आलेले असतानाच कचऱ्याने भरलेल्या या घंटागाडय़ा कुठल्या जागेवर रिकाम्या करायच्या या समस्येने येथील नगरपंचायतीला ग्रासले आहे. ३५ हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या वाडा नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात रोज निघणारा २० ते २५ टन घन कचऱ्याचे व्यवस्थापन कसे व कुठे करायचे याबाबतचे नियोजन करण्यात नगरपंचायतीला गेल्या तीन वर्षांंत यश आलेले नाही.

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी नगरपंचायतीच्या मालकीची स्वतंत्र अशी जागा नसल्याने या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी नगरपंचायतीने जाहिरातीसाठी हजारो रुपये मोजले आहेत. नगरपंचायत लगत वन विभागाची जागा मोठय़ा प्रमाणात आहे. या जागेमधील दोन अडीच एकर जागा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत मात्र यश आलेले नाही. काही जमीन मालकांनी जागा देऊ केली आहे, मात्र राजकीय वादविवादात एकमत होत नसल्याने ही जागा खरेदी करण्याचा प्रस्ताव अडकून पडले आहे.

सद्या एका खाजगी जागा मालकाकडून दरमहा १५ हजार रुपये भाडे तत्त्वावर घेतलेल्या जागेवर कचराभूमी केली आहे. मात्र ही जागा वाडा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा नदीच्या जलसाठय़ालगत आहे. येथील कचराभूमीतून निचरा होणारे दूषित पाणी पावसाच्या पाण्याने जलाशयात वाहून जात आहे. यामुळे येथील कचराभूमी अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी  होत आहे. कचराभूमीलगत स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता असून या रस्त्यावर कचराभूमीतील कचरा नेहमीच येत असल्याने त्याबाबत ही नागरिकांची ओरड सुरू आहे.

कचराभूमीसाठी नव्याने जागा मिळण्यासाठी नगरपंचायतीचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल.

– गीतांजली कोलेकर, नगराध्यक्षा, वाडा नगरपंचायत