शाळा सुरू करण्याबाबत ३१ जुलै नंतर येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार टप्याटप्याने निर्णय घेता येईल. मात्र तोपर्यंत विविध माध्यमांच्याद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक सूचना, सुविधा पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. महापालिकेचा ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ या उपक्रमाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांऐवजी  शिक्षकच त्यांच्या घरापर्यंत जाण्याचा स्तुत्य उपक्रम जिल्हाभरात राबविता येईल का? या दृष्टीने सकारात्मक विचार करण्याचे निर्देश पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिले.

जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, नगरपालिका प्रशासन यांच्या मार्फत चालविण्यात येणाऱ्या शाळा संदर्भात वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांनी पुढील काळामध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे, याकरिता सरपंचाशी संपर्क साधला आहे. तर महानगरपालिका प्रशासनाने आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षकांना पाठवून त्यांच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे. नगरपालिका, नगरपंचायती स्तरावरदेखील ऑनलाइन पद्धतीने शैक्षणिक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करण्याचे काम सुरू आहे. आम्ही सर्व एका नव्या परिस्थितीला तोंड देत असताना, शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत आहोत. याचा उद्देश एकमेव विद्यार्थ्यांचा विकास असून त्यासाठी सर्वांनी हेतू समजून याला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

विद्यापीठ स्तरावरील परिक्षा, माध्यमिक व प्राथमिक स्तरावरील शाळा, हे सध्या ऐरणीचे मुद्दे आहेत. शाळेचा निर्णय १ जुलैनंतर अपेक्षित आहे. मात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपापल्या कामासाठी शाळेत उपस्थित राहावे, चंद्रपूर जिल्हा कार्य क्षेत्रातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे ठरले आहे. महाविद्यालयाबाबत निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे चंद्रपूर महानगर पालिकेने सुरू केलेल्या मोहिमे प्रमाणे विद्यार्थ्यांऐवजी शिक्षक त्यांच्या घरापर्यंत जाण्याचा एक स्तुत्य उपक्रम अनेक ठिकाणी राबविता येईल, असे ते म्हणाले.

तसेच, ज्या विद्यार्थ्यांजवळ, कुटुंबाजवळ स्मार्टफोन नाही याचा अंदाज घेतल्या जात आहे. त्यांना पर्यायी कोणती व्यवस्था उपलब्ध करता येईल. याबाबतही आम्ही विचार करीत आहोत. त्यामुळे टीव्ही, रेडिओ, स्मार्टफोन आदी संपर्क साधनांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांसाठी एकत्रित धोरण ठरविले जाईल. जिल्ह्याात मोठ्या प्रमाणात डिजिटल माध्यमांचा शैक्षणिक सत्रामध्ये वापर करण्याचा निर्धार जवळपास पक्का असल्यामुळे या संदर्भात शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी ही सुरुवात करण्याचे निर्देशही आपण दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.