मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ठाम भूमिका

पालघर : वाढवण बंदराला शिवसेनेचा कायम विरोध राहणार आहे, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. वाढवण बंदराबाबत विधानभवनात मुख्यमंत्री आणि वाढवणविरोधी संघर्ष समितीच्या सदस्यांची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका घेतली.

राज्य शासन म्हणून वाढवण बंदराबाबत केंद्र सरकारचा प्रस्ताव आल्यास केंद्र सरकार आणि स्थानिक नागरिक या दोघांची बाजू विचारात घेऊनच निर्णय घेऊ, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी समितीला सांगितले. केंद्र शासनाने वाढवण बंदराला तत्त्वत: मंजुरी दिली असली किंवा त्याला ६५ हजार कोटींचा निधी जाहीर केले असले तरी राज्य शासनापर्यंत असा कोणत्याही बंदराचा प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे आधी हा प्रकल्प समजून घ्या आणि त्यानंतर तो जनतेला नको हवा असल्यास राज्य शासन म्हणून त्याला नकार दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी वाढवणविरोधी संघर्ष समितीला सांगितल्याची माहिती समितीचे सहसचिव वैभव वझे यांनी दिली. पालघर जिल्ह्यात वाढवण येथे बंदर उभारल्यास येथील मच्छीमार आणि शेतकरी उद्ध्वस्त होतील. त्यामुळे हे बंदर होऊ  नये, अशी मागणी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीने घेतली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची विधान भवनात भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

वाढवण बंदराबाबत मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली असून पूर्वीसारखा वाढवण बंदराला असलेला शिवसेनेचा विरोध आजही कायम आहे. तशीच भूमिका आजही उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे. – नारायण पाटील, अध्यक्ष, वाढवण बंदरविरोधी कृती समिती

वाढवण बंदराला येथील जनतेचा असलेला विरोध लक्षात घेता वाढवणविरोधी संघर्ष समितीशी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यानी सकारात्मकता दाखविली आहे. या भागातील खासदार म्हणूनही मी येथील जनतेच्या पाठीशी आहे. बंदराबाबत राज्य शासन जो निर्णय घेईल, यो योग्यच असेल. – राजेंद्र गावित, खासदार, पालघर