सिक्कीमच्या राज्यपालपदी पश्चिम महाराष्ट्रातील माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी संधी दिल्यामुळे खासदार जर्नादन वाघमारे यांच्या समर्थकांमध्ये दबक्या आवाजात नाराजीचा सूर उमटत आहे.
पवार यांचे लातूरचे प्राचार्य जर्नादन वाघमारे यांच्यावर मनापासून प्रेम होते. त्यातूनच त्यांना नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ कुलगुरुपदाचा बहुमान मिळाला. वाघमारे सरांच्या कर्तृत्वामुळे मुख्यमंत्रिपदी विलासराव देशमुख असतानाही लातूरकरांनी नगराध्यक्षपदाचा बहुमान वाघमारे यांना दिला होता. पवारांनी वाघमारे सरांचा सन्मान वाढवत त्यांना राज्यसभेत पाठवले. विलासराव मुख्यमंत्री असतानाच्या काळात लातुरात राष्ट्रवादीला ताकद देण्याचे काम वाघमारेंच्या माध्यमातून झाले. राष्ट्रवादीच्या कोटय़ात राज्यपालपद वाढवून मिळाल्यास वाघमारे यांना राज्यपालपदाची संधी दिली जाणार असल्याचे सूतोवाच पवारांनी फार वर्षांपूर्वी केले होते. मात्र, ही संधी मिळत नसल्यामुळे वाघमारे सरांचा सन्मान होत नाही, अशी त्यांच्या समर्थकांची भावना झाली होती.
वाघमारे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त लातुरात आयोजित नागरी सत्कारात पवारांचे भाषण प्रचंड गाजले. नाशिक शहरात कुसुमाग्रजांचे किंवा औरंगाबाद शहरात गोिवदभाई श्रॉफ यांचे जे महत्त्व आहे, तसेच लातुरात जर्नादन वाघमारे यांचे आहे. संध्याकाळच्या वेळी निवांत गप्पा मारायला जाण्याचे ठिकाण, एका विचारवंताशी मुक्त चर्चा करायला मिळते याचे समाधान देणारी व्यक्ती म्हणजे जनार्दन वाघमारे, अशा शब्दांत पवारांनी वाघमारेंची प्रशंसा केली होती. त्या भाषणालाही आता दोन वष्रे उलटून गेली आहेत. सिक्कीमच्या राज्यपालपदाची संधी चालून आल्यानंतर वाघमारे यांचा पवार सन्मान करतील, असे त्यांच्या समर्थकांना मनापासून वाटत होते. मात्र, पवारांनी पश्चिम महाराष्ट्राला पुन्हा एकदा झुकते माप दिले. श्रीनिवास पाटील यांचे पवार कुटुंबीयांशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळेच वाघमारे यांचे नाव विसरून पाटील यांना संधी मिळाली. दीड वर्षांपूर्वी लातूर महापालिकेच्या निवडणुकीची धुरा वाघमारे यांच्यावर सोपविली होती. या निवडणुकीत जास्त संख्येने नगरसेवकांना निवडून आणण्याची कामगिरी वाघमारे यांनी केली होती. वाघमारेंच्या या कार्याची दखल घ्यायला हवी होती. वाघमारे यांचे वर्गमित्र शिवराज पाटील चाकूरकर पंजाबचे राज्यपाल आहेत. याही वर्गमित्राला चाकूरकरांच्या बरोबरीचा दर्जा पवारांनी दिला असता तर अधिक बरे झाले असते, अशी भावना वाघमारे समर्थकांत आहे.
वाघमारे सरांचा चाहतावर्ग मराठवाडय़ासह राज्यभरात आहे. अर्थात, पवारांचा शब्द अंतिम असल्याने या बाबत उघड बोलण्यास कोणी तयार नाही. पवार एरवी कौतुक करतात व नेमकी काही देण्याची वेळ आली की, पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप देतात हे राज्यपाल निवडीवरून पुन्हा सिद्ध झाले आहे.