कापसापाठोपाठ ज्वारीसाठी ओळखल्या जाणाऱ्या परभणी जिल्ह्यात यंदा ज्वारीचे पीक उत्तम आले आहे. सध्या हुरडय़ात असलेली ज्वारी काढणीसाठी काही दिवसांतच शेताशिवारात लगबग सुरू होईल. ज्वारीचे उत्पादन चांगले झाल्यास जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न कडब्याच्या रुपाने सुटणार आहे. यंदा तरी जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन चांगले होईल, असे संकेत आहेत.
ज्वारीचे पीक ही परभणी जिल्ह्याची खास ओळख. परभणी जिल्हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत हे पीक घेतले जाते. काळाच्या ओघात संकरीत ज्वारीचा पेरा वाढला, संकरीत ज्वारीचे नवनवे वाणही आले. पण बिगर संकरीत ज्वारीचे क्षेत्र जिल्ह्यात आजही मोठय़ा प्रमाणात आहे. या वर्षीही जिल्ह्यात ज्वारीचे पीक कुठे हुरडय़ात आले, तर कुठे हुरडाही वाळून चालला आहे.
ज्वारीचे क्षेत्र अत्यल्प असणाऱ्या जिल्ह्यांतही व्यावसायिक पद्धतीने हुरडा पाटर्य़ा होतात. रस्त्यालगत शेतांमध्ये हुरडय़ाचा आस्वाद घेण्यास प्रवासी ग्राहकही मोठय़ा संख्येने येतात. हुरडय़ाचा संपूर्ण हंगाम असा लज्जतदार होत राहतो. खास हुरडय़ासाठी ‘गुळभेंडी’, ‘रावसाहेब’ या जाती आहेत. या दोन्ही जातींचा हुरडा चवदार असतो. शिवाय भाजलेल्या कणसांना केवळ हातानेही चोळले, तरीही हा हुरडा गोंडराशिवाय बाहेर पडतो. शेतकरी मुद्दाम खास हुरडय़ासाठी ज्वारीच्या पिकात हुरडय़ाच्याही काही जाती आवर्जून पेरतात. ज्वारीचे कोठार असलेल्या परभणी जिल्ह्यात अजून तरी रस्त्यालगत हुरडा पाटर्य़ा रंगताना दिसत नाहीत. आप्तेष्ट, मित्रांसह शेतात हुरडा खाल्ला जातो. मात्र, अन्य जिल्ह्यांमध्ये काही प्रयोगशील शेतकरी ज्या पद्धतीने व्यावसायिक तत्त्वावर शेतात हुरडा पाटर्य़ा करतात, तशा पाटर्य़ा जिल्ह्यात होत नाहीत.
गेल्या काही वर्षांत संकरीत ज्वारीचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणात वाढले. पूर्वी मूग, उडीद पिकानंतर ज्वारीचे पीक घेतले जात असे. कापसापाठोपाठ रब्बी ज्वारी हेच महत्त्वाचे पीक होते. तथापि आता संकरीत ज्वारीचेही क्षेत्र मोठे आहे. उत्पादन जास्त असल्याने शेतकरीही या ज्वारीला पसंती देतात. मात्र, संकरीत व रब्बी ज्वारी यात बाजारभावातही दुपटीहून अधिक फरक आहे. संकरीत ज्वारीपेक्षा रब्बी ज्वारी कसदार, पौष्टीक मानली जाते. पूर्वी संकरीत ज्वारीत अधिक उत्पादन देणाऱ्या जाती ‘लाल गोंडर’ असलेल्या होत्या. या ज्वारीची भाकरीही लालसर असे. आता संकरीत ज्वारीतही पांढऱ्याशुभ्र व दाणेदार कणसांचे बियाणे आले आहे. तरीही त्याला रब्बी ज्वारीची सर नाही. रब्बी ज्वारीतही अनेक प्रकार आहेत.
मराठवाडय़ात परभणी जिल्ह्यात ज्वारीचा खास पट्टा आहे. ही ज्वारी सर्वदूर प्रसिद्ध आहे. पूर्वी मळणीयंत्र नव्हते, तेव्हा जिंतूरमधील शेतमजूर जिल्ह्यातील ज्वारीच्या कार्यक्षेत्रात येऊन सुगीची कामे करीत. उत्पादनातील विशिष्ट हिस्सा घेऊन केल्या जाणाऱ्या या कामाला ‘खोती’ असे म्हटले जाते. आता मळणीयंत्राने ज्वारीची काढणीही सोपी झाली.
रब्बी ज्वारीचे जिल्ह्यातील क्षेत्र मोठे आहे. या ज्वारीचेही अनेक प्रकार आहेत. ‘टाळकी’, ‘दगडी’,‘माळदांडी’,‘मंठी’ अशी नावे ज्वारीच्या प्रकारांना आहेत. यातली सर्वात टपोरी व दाणेदार अशी ज्वारी ‘माळदांडी’ मानली जाते. गेल्या २५ वर्षांंत संकरीत ज्वारीचे क्षेत्र वाढत आहे. उत्पादनही मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. अशा स्थितीत जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे क्षेत्र घटत असले, तरीही या ज्वारीचे महत्त्व निश्चित आहे. ज्वारीचे क्षेत्र कमी होत असले, तरीही ज्वारीचे कोठार ही ओळख अजूनही जिल्ह्याने कायम ठेवली आहे. ‘जोंधळा’ या नितांत सुंदर शब्दांनी ओळखली जाणारी ही ज्वारी परभणी जिल्ह्याचे खास वैशिष्टय़ आहे. या वर्षीही ज्वारीचा हंगाम चांगला व्हावा आणि दाणेदार अशा जोंधळ्याचे उत्पादन वाढावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. विशेषत: गेल्या दोन वर्षांत शेती व्यवसायात मोठय़ा प्रमाणात पडझड होत असल्याने आणि कापसाने निराशा केल्याने ज्वारीचे दाणे शेतकऱ्यांच्या पदरी भरपूर पडले, तर एकाच वेळी पोटापाण्याचा आणि जनावरांच्याही चाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे.

Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार