हर्षद कशाळकर

पावसाच्या तोंडावर निवारेच जमीनदोस्त झालेले.. अन्न-धान्य भिजून सडू लागलेले.. उद्ध्वस्त गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरलेले.. विजेअभावी पाण्याचा पुरवठाही बंद झालेला.. आणि हतबल ग्रामस्थ सरकारी मदतीकडे डोळे लावून बसलेले..असे अस्वस्थ करणारे विदारक चित्र रायगडच्या वादळग्रस्त गावांमध्ये आहे. घरे, बागा, शेतीवाडी उजाड झालेल्या रायगडच्या डोळ्यांना अश्रूंची धार लागली आहे आणि ते पुसण्यात सरकारी यंत्रणा तोकडी पडत आहे.

रायगड जिल्ह्य़ातील एक हजार ९०५ गावांना निसर्ग वादळाचा तडाखा बसला. श्रीवर्धन तालुक्याला सर्वाधिक. या तालुक्यातील अनेक गावे शब्दश: उद्ध्वस्त झाली आहेत. परंतु पाच दिवसांनंतरही तेथे सरकारी यंत्रणा पोहोचली नसल्याने ग्रामस्थांचा आक्रोश काळजाचा ठाव घेत आहे. वादळामुळे फाटलेल्या आभाळाला ठिगळ तरी कुठे-कुठे लावावे, अशा विवंचनेत जिल्ह्य़ातील शेकडो वादळग्रस्त गावे सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.

वादळाने हरिहरेश्वरला जवळजवळ जमीनदोस्त केले. गावातील जवळपास सर्वच घरांची मोडतोड झाली. गावात येणारे रस्तेही बंद झाले होते. परंतु चार दिवस प्रशासकीय यंत्रणा पोहोचल्याच नव्हत्या. प्रशासकीय मदत पोहोचू शकली नाही. आता येथील रस्ते मोकळे झाले आहेत. गावात प्रशासकीय यंत्रणा पोहोचल्या. अधिकाऱ्यांनी फक्त पाहणी केली आणि निघून गेले, अशी खंत हरीहरेश्वर येथील संतोष जाधव यांनी व्यक्त केली.

चौल येथील प्रणय घरत यांच्या नारळ, सुपारीचे वादळात मोठे नुकसान झाले. बागेतील ५२ नारळ, १२३ सुपारी, तर ५ फणसाची झाडे वादळाने उन्मळून पडली. वाडीतील घराचेही नुकसान झाले आहे. पाच दिवस झाले तरी पंचनामे करण्यासाठी त्यांच्याकडे अद्याप कोणी आलेले नाही. शासनाकडून कुठलीही मदत मिळालेली नाही, असे घरत यांनी सांगितले.

जांभुळपाडा पालंबे येथे संदेश पाटील यांच्या आंब्याच्या बागेचे मोठे नुकसान झाले. १२ एकरमधील २५ टक्के झाडे वादळाने मोडली आहेत. मात्र, पंचनाम्यासाठी अद्याप कोणीही आलेले नसल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे.

बसस्थानकाचा आसरा 

श्रीवर्धनमधील मेटकर्णी गावातील अनेक घरांची पडझड झाली. तेथील बेघर झालेल्या सहा-सात कुटुंबांनी श्रीवर्धन बसस्थानकात आसरा घेतला आहे. वादळात वाचलेले किडुकमिडुक साहित्य घेऊन तेथेच संसार मांडला आहे. श्रीवर्धनमधील नागरिकांनी दिलेल्या अन्न-धान्यावर गुजराण करीत आहेत. आपली घरे पुन्हा उभी राहावीत ही कुटुंबे सरकारी मदतीची वाट पाहत आहेत. तहसिल कार्यालयाशी संपर्क साधूनही मदत मिळ नसल्याची त्यांची तक्रार आहे.

संसार पुन्हा उभे करण्यासाठी..

सरकारी अधिकारी आज येतील, उद्या येतील, मदत करतील, असे करता-करता पाच दिवस लोटले, पण आजही अनेक गावांमध्ये सरकारी यंत्रणा फिरकलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत अनेक गावांतील ग्रामस्थच एकमेकांना आधार देत आहेत. अन्न-पाण्याची व्यवस्था करीत आहेत. एकमेकांचे उद्ध्वस्त संसार पुन्हा उभे करण्यासाठी धडपडत आहेत.