10 August 2020

News Flash

कोकणातील वादळग्रस्तांना शासकीय मदतीची प्रतीक्षाच!

रायगड जिल्ह्य़ातील गावागावांत संताप, पंचनामे झाले पुढे काय?

संग्रहित छायाचित्र

हर्षद कशाळकर

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसल्यास तीन आठवडे झाले तरीही वादळग्रस्तांना अजूनही शासकीय मदतीची प्रतीक्षाच आहे. शासनाने आमच्या तोंडाला पाने पुसली, अशी उद्विग्न प्रतिक्रिया वादळग्रस्त नागरिक व्यक्त करत आहेत.

चार तासांचे वादळ आले आणि आम्हाला १० ते १५ वर्षे मागे सारून गेले. आधी करोनाच्या टाळेबंदीने आणि नंतर निसर्ग चक्रीवादळाने सारेच हिरावून घेतले. मुख्यमंत्री, मंत्री आणि नेते आले, पाहणी करून गेले, पंचनामे झाले, मदत काही मिळाली नाही. आश्वासनांपलीकडे काहीच मिळाले नाही, असा संताप गावागावांतून व्यक्त होत आहे.

वादळामुळे बागायतींचे मोठे नुकसान झाले आहे. जी झाडे वाचली आहेत, ती येत्या पावसात टिकतील अथवा नाही हे सांगता येणार नाही. वाडीतून फिरतानाही आता भीती वाटू लागली आहे. झाडावरून कधी झाप कोसळतात, तर कधी नारळ पडतात. वाकलेली झाडे उन्मळून पडतात. वारा सुटला तरी काळजाचा ठोका चुकतो, असे बागायतदार सांगतात.

वादळानंतर अनेक मंत्री आणि नेत्यांनी येथील परिस्थितीची पाहणी केली, छायाचित्रे काढली, मदतीची आश्वासने दिली गेली; पण प्रत्यक्ष मदत काही पोहोचलीच नाही. किरकोळ धान्य आणि केरोसीन सोडले तर बहुतांश आपद्ग्रस्त मदतीपासून आजही वंचित आहेत. श्रीवर्धन, म्हसळा, तळा, मुरुड आणि अलिबाग तालुक्यातील अनेक गावे अजूनही अंधारात चाचपडत आहेत.

रायगड, रत्नागिरी जिल्ह्य़ांसाठी सरकारने वाढीव मदत जाहीर केली; परंतु ही मदत अद्यापही गावातील लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रिपब्लिकन नेते आणि के ंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले आदींनी वादळग्रस्त भागाला भेट देऊन वादळग्रस्तांशी संवाद साधला. रायगड जिल्ह्य़ात राष्ट्रवादी आणि शिवसेनेची चांगली ताकद आहे. यामुळेच या पक्षांच्या दोन्ही नेत्यांनी मदतीचे भरभरून आश्वासन दिले. रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांनी  नुकसानीची पाहणी केली; परंतु मदत मिळालेली नाही.

मदतवाटपाचे काम सुरू आहे. शनिवारी आणि रविवारी आपण बँका सुरू ठेवून, मदतनिधीचे वितरण करत आहोत. तांत्रिक कारणामुळे यात विलंब होत असला तरी ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांच्या खात्यात सात दिवसांत मदतनिधी जमा केला जाईल.

– निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

आमच्या वाडीतील १५ नारळ आणि एक हजार सुपारीची झाडे उन्मळून पडली. किमान १० वर्षे तरी आमची बाग सावरू शकणार नाही. पंचनामे करण्यात आले; पण अजून तरी कुठलीही मदत मिळालेली नाही.

– संजय आचार्य, बागायतदार, चौल

मंत्री आले, राजकीय पुढारी आले, परिस्थितीची पाहणी करून गेले. प्रशासनाने गावातील नुकसानीचे सर्वेक्षणही केले. पंचनामेही पूर्ण झाले; पण तीन आठवडे झाले तरीही शासनाची मदत मिळालेली नाही. आधी घरांच्या आणि नंतर बागायतींच्या नुकसानभरपाईपोटी मदत मिळेल, असे सांगण्यात आले; पण तसे काही घडले नाही.

– कृष्णकांत तोडणकर, आपद्ग्रस्त, दिवेआगर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 12:18 am

Web Title: waiting for government help for the storm victims in konkan abn 97
Next Stories
1 धुळ्यात करोनाचे ८७ नवीन रुग्ण
2 रत्नागिरीत आणखी एका परिचारिकेला करोनाची लागण
3 रायगड जिल्ह्यात करोनाचे १४२ नवे रुग्ण
Just Now!
X