नव्या शैक्षणिक वर्षांचा प्रारंभ झाल्याने आता शिवाजी विद्यापीठाला नव्या कुलगुरूंच्या निवडीची प्रतीक्षा लागली आहे. मावळते कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांची मुदत संपून बराचसा कालावधी लोटला असताना नव्या निवडीकरिता राज्यपालांकडे मुलाखती होऊन आठवडा पूर्ण होत आला आहे. मुलाखतीनंतर लगेचच निवड झाहीर होत असल्याचा पूर्वानुभव असल्याने यावेळची कुलगुरू निवड का लांबत चालली आहे याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात होऊ लागली आहे. राज्य मंत्रिमंडळातील एका वजनदार मंत्र्याने कुलगुरू पदासाठी लॉबिंग केल्याने निवड रेंगाळली असल्याची चर्चा आहे.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पवार यांची मुदत २० फेब्रुवारी रोजी संपली. त्यानंतर नव्या कुलगुरुपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली. त्यातून पाचजणांची नावे पुढे आली. त्यामध्ये डॉ. नितिन करमळकर (पुणे), शिवाजी विद्यापीठाचेच डॉ. गोिवद वार, डॉ. लालासाहेब देशमुख (सोलापूर), डॉ. कल्याणकर (नांदेड) व डॉ. देवीदास िशदे (औरंगाबाद) यांची मुलाखत राज्यपालांनी घेतली. त्यास आठवडय़ाचा कालावधी पूर्ण झाल्याने निवड कधी जाहीर होणार याकडे विद्यापीठाचे लक्ष वेधले गेले आहे. यापूर्वी मुलाखती झाल्यानंतर एक-दोन दिवसातच कुलगुरू निवडीची औपचारिकता पार पाडली जात असे. पण यंदा विलंब होत असल्याने त्याच्या कारणमीमांसेवरून विद्यापीठात तर्कवितर्क रंगले आहेत.
राज्य मंत्रिमंडळातील एका वजनदार मंत्र्यांनी विशिष्ट नावाचा आग्रह धरला असल्याचे सांगितले जाते. त्यातून काही नावे जाणीवपूर्वक पुढे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे विद्यापीठात विनाकारण वातावरण गढूळ होत चालले आहे, तर शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक, सामाजिक परिस्थितीचे संदर्भ लक्षात घेऊन निवड रेंगाळली असल्याचेही सांगितले जात आहे. विद्यापीठ प्रशासन, प्राध्यापक संघटना व विद्यार्थी संघटना यांच्याशी समन्वय ठेवणाऱ्या कुलगुरूची निवड केली जावी, असा एक प्रवाह पुढे येत आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कुलगुरूंची निवड पार पाडली जावी, अशी शासकीय पातळीवरून मांडणी होत असल्याचेही एकंदरीत हालचाली पाहता दिसत आहेत.
कुलगुरूंची मुदत संपून चार महिन्यांचा कालावधी संपला आहे. नव्या शैक्षणिक वर्षांला सुरुवात झाली आहे. यंदा बारावीचा निकाल विक्रमी लागला असल्याने महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रिया गंभीर स्वरूप धारण करण्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत शासकीय व विद्यापीठ कायद्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी कुलगुरूंचे नियंत्रण अत्यावश्यक बनले आहे. ही बाब लक्षात घेऊन विद्यपीठाला नवा कुलगुरू लवकर मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.