मोहनीराज लहाडे

५९ व्या मराठी राज्य नाटय़ स्पर्धेसह संगीत, संस्कृत, बालनाटय़ स्पर्धा आटोपून वर्षांहून अधिक कालावधी उलटला, मात्र राज्य सरकारने अद्यापि स्पर्धेतील विजेत्या हौशी कलाकारांच्या पारितोषिकाची रक्कम आणि स्पर्धा झालेल्या नाटय़गृहांचे भाडे दिलेले नाही. सुमारे २ कोटीहून अधिक रक्कम थकली आहे. नाटय़क्षेत्रातील हौशी कलावंत व नाटय़गृह चालकांकडून वारंवार पाठपुरावा करूनही राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने ही रक्कम त्यांना दिलेली नाही. याबद्दल नाटय़ वर्तुळातून संतापाची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

करोना संकटकाळात आर्थिक फटका बसलेले हौशी कलावंत व नाटय़गृह चालकांना राज्य सरकारकडून वेळीच रक्कम मिळण्याची अपेक्षा होती, मात्र असा दिलासा मिळू शकला नाही. यामधून राज्य सरकार सांस्कृतिक क्षेत्राकडे उदासीनतेने पाहात असल्याची भावना व्यक्त होत आहे. नाटय़क्षेत्राच्या प्रोत्साहनासाठी  तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी या स्पर्धा सुरू केल्या. मात्र अडचणीच्या काळात सध्याच्या सरकारकडून उपेक्षा झाली आहे.

सांस्कृतिक कार्य विभागाने सन २०१९ च्या मराठी नाटय़ स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. १५ नोव्हेंबर २०१९ ते २ जानेवारी २०२०  दरम्यान १९ शहरातील केंद्रांवर घेतली. ४५७ नाटय़संस्था सहभागी होत्या. त्यांची अंतिम फेरी दि. ३ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत औरंगाबादमध्ये झाली. त्यामध्ये ४६ नाटय़संस्थांचा समावेश होता. बालनाटय़ स्पर्धा १० केंद्रांवर  दि. ३ ते १८ जानेवारी २०२०  दरम्यान झाल्या. त्यात ३३७ संस्था सहभागी होत्या. दिव्यांग बालनाटय़ स्पर्धा लातूर व नाशिक केंद्रांवर  दि. ३ ते १५ फेब्रुवारी २०२० मध्ये झाल्या, त्यामध्ये २४ संस्था, तर संगीत नाटकांची अंतिम फेरी इचलकरंजी केंद्रावर दि. १६ जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२० दरम्यान झाली, त्यात २६ संस्था सहभागी होत्या. संस्कृत नाटय़स्पर्धेची अंतिम फेरी पुणे, मुंबई, नागपूर व नाशिक या केंद्रांवर दि. १८ जानेवारी ते २६ जानेवारी २०२० या कालावधीत झाली.

स्पर्धेसाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून केंद्र असलेल्या शहरातील नाटय़गृहे भाडय़ाने घेतली जातात. केंद्रावरील सहभागी नाटय़संघांच्या संख्येनुसार किमान ८ ते २०—२२ दिवस स्पर्धा सुरू असतात. करोना संकटकाळात गेले नऊ—दहा महिने कार्यक्रम होऊ न शकल्याने नाटय़गृहांचे व्यवस्थापन आर्थिक अडचणीत आले. काही ठिकाणच्या व्यवस्थापनाने कामगार कपातही केली. अशा अडचणीच्या काळात तरी सरकारने भाडय़ाची रक्कम वेळेत द्यायला हवी होती, अशी अपेक्षा नाटय़गृह चालकांची होती.

स्पर्धेतील सहभागी नाटय़संघांच्या निर्मिती खर्चाबरोबरच प्रवास भत्त्याची रक्कमही कलाकारांनी आवाज उठवल्यानंतर गेल्या महिन्यात मिळाली. मात्र स्पर्धेत विजेते ठरलेले नाटक व विविध पारितोषिके मिळवणारे कलाकार (दिग्दर्शक, नेपथ्य, प्रकाश, संगीत दिग्दर्शन, अभिनय) पारितोषिकाच्या रकमेपासून अद्यापि वंचितच आहेत.

केवळ आश्वासन

माउली सभागृहात दि. १५ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१९ या कालावधीत स्पर्धा झाल्या. त्याची भाडे रक्कम ४ लाख ६७ हजार ८०२ रुपये (जीएसटीसह) होते. वेळोवेळी संपर्क केल्यानंतर आता मार्चमध्ये रक्कम मिळेल, असे आश्वासन मिळाले. ‘माउली’ चे सुमारे ४ लाख रुपयांचे वीजबिल थकले आहे. संस्थेच्या आर्थिक अडचणीत थकलेले भाडे मिळावे, ही अपेक्षा.

—दिनकर घोडके, अध्यक्ष, माउली सभागृह, नगर.

महिनाभरात रक्कम उपलब्ध होईल

राज्य नाटय़ स्पर्धेतील विजेत्या कलाकारांच्या पारितोषिकाची रक्कम तसेच नाटय़गृहांचे भाडे रक्कम असा सुमारे २ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवला आहे. टप्प्याटप्प्याने हे पैसे मिळतील. यापूर्वी सहभागी नाटय़संघांना निर्मिती खर्च व प्रवासभत्ता दिला आहे. येत्या महिनाभरात भाडे रक्कम व पारितोषिकाची रक्कम उपलब्ध होईल.

– बिभीषण चौरे, संचालक ,सांस्कृतिक कार्य विभाग.