पावसाळय़ात रानफुले पाहण्यासाठी येणाऱ्या शेकडो पर्यटकांच्या सोयीसाठी कास पठारावर आता पर्यटकांसाठी जांभ्या दगडात पायवाटा करण्यात येत आहेत. या हंगामाची पूर्वतयारी म्हणून वन विभागाकडून ही उपाययोजना सुरू केली आहे.

जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर पावसाळय़ात रानफुलांचा हंगाम सुरू होतो. या विस्तृत पठारावर ही रानफुले हजारोंच्या संख्येने उमलतात. परंतु त्यांच्या संरक्षण आणि जतनाच्या हेतूने त्यातून फि रण्यास मनाई असल्यामुळे पर्यटक-अभ्यासकांना ही फुले केवळ मुख्य रस्त्याकडेचीच पाहता येतात. आता या नव्या वाटा तयार केल्यामुळे या फुलांच्या पठारावर पर्यटकांना आतमध्ये सर्वत्र फिरता येईल आणि त्यामुळे या फुलांमध्ये न चालल्यामुळे त्यांचेही जतन होईल.

कास पठार कार्यकारी समिती व वन विभागाच्या वतीने या पायवाटा तयार करण्याचे काम सुरू आहे. कास पठारावरील जुन्या पायवाटांवरच साधारणपणे दोन पर्यटक ये-जा करू शकतील या आकाराच्या या पायवाटा बांधल्या जात आहेत. यावरून पर्यटकांशिवाय स्वयंसेवक आणि मार्गदर्शक यांना फिरणे, फुलांची माहिती घेणे, छायाचित्र काढणे सोपे हाईल.

कास पठारावर येणारे पर्यटक हे बहुतांश शहरी भागातील व परराज्यातून आलले असतात. या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने या काळात जमिनी शेवाळलेल्या असतात. बहुतांश पर्यटकांना येथील भौगोलिक परिस्थितीचा अंदाज नसतो. यामुळे पठारावर चालत फुलांचा आनंद घेताना बऱ्याचदा पर्यटक पाय घसरून पडतात. यामुळे त्यांना त्रास होतो व इजा होऊ  शकते आणि याशिवाय पर्यटकांच्या पायाखाली फुले तुडवली जातात. या सर्वाचा विचार करून पर्यटन समिती कास पठार व वन विभाग त्यांच्या वतीने ही पायवाट तयार करण्यात येत असल्याचे कास पठार कार्यकारी समितीचे अध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी सांगितले.