अंबरनाथमध्ये संरक्षक भिंत कोसळल्याने एका अल्पवयीन तरुणाचा मृत्यू झाला आहे. संरक्षक भिंत घरावर कोसळून ही दुर्घटना घडली आहे. वडोळ गावात ही दुर्घटना घडली आहे. किरण गायकवाड असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून त्याचे वडील सुर्यकांत गायकवाड जखमी झाले आहेत. दरम्यान मुंबईतील पायधुनी येथे एका इमारतीचा काही भाग कोसळला आहे. इमारतीत कोणी राहत नसल्या कारणाने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.

याआधी सकाळी वडाळ्यातील अँटॉप हिल परिसरात दोस्ती पार्क इमारतीजवळील रस्ता खचल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. रस्ता खचल्याने इमारतीची संरक्षक भिंत देखील कोसळली असून या घटनेत सुमारे १५ गाड्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी रस्त्याच्या दर्जाबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

वडाळ्यातील विद्यालंकार रोडवरील लॉर्ड्स इस्टेट परिसरात दोस्ती पार्क इमारत आहे. या इमारतीजवळील रस्ता सोमवारी खचला. यामुळे रस्त्यावर मोठा खड्डाच पडला असून यात सात गाड्यांचे नुकसान झाले आहे.

मुंबईत रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अँटॉप हिल परिसरात असलेल्या लॉईड्स ईस्टेटच्या कम्पाऊंड जवळ असलेला मोठा भाग सोमवारी सकाळी कोसळला. त्यात जवळपास १५ कार दबल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.या बांधकामाविषयी स्थानिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.शेजारी सुरू असलेल्या बांधकामुळे ही दुर्घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. ‘दोस्ती एकर्स’ ला बीएमसी अधिकाऱ्यांनी पाठीशी घातल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप देखील स्थानिकांनी केला आहे.