पिंपरी-चिंचवडच्या कासारवाडी येथे इमारतीची सीमा भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. लोकेश ठाकूर अस सहा वर्षीय मुलाचे नाव असून त्याचं कुटुंब हे मूळ बिहार येथील आहे. इमारतीच्या पाठीमागील बाजूस ड्रेनेजचे काम सुरू होतं. तेवढ्यात सीमाभिंत कोसळून दोन कामगार आणि लगतच खेळत असलेला लोकेश ढिगाऱ्याखाली अडकला. मजुरांचा जीव वाचला असून तब्बल साडेतीन तास मृत्यू शी झुंज देत असलेल्या लोकेश चा मात्र यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहिती अशी की, शनिवारी दुपारी साडेतीन च्या सुमारास कासारवाडी येथील यशवंत प्राईड या सोसायटीच्या पाठीमागील बाजूस सीमाभिंती लगत ड्रेनेज चे काम सुरू होते. मयत लोकेश हा तिथेच शेजारी खेळत होता. अचानक सीमाभिंत कोसळली त्यात दोन कामगार अडकले त्यांना किरकोळ जखम झाली. सुखरूप बाहेर काढण्यात आल. परंतु,लोकेश कुठेच दिसत नव्हता. शेजारील महिलेने लोकेश ढिगाऱ्याखाली गाडला गेल्याची भीती व्यक्त केली. अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न करत कोसळलेली भिंत बाजूला केली. परंतु लोकेशचा थांगपत्ता लागत नव्हता.

मात्र,साडेतीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर लोकेश ढिगाऱ्या खाली जखमी अवस्थेत दिसला. ही बाब समजताच लोकेश च्या आईने हंबरडा फोडला त्यांना अश्रू अनावर झाले होते. त्या मोठमोठ्याने रडत होत्या. हे सर्व पाहून स्थानिक नागरिक, अग्निशमन दल, पोलीस, हे भावनिक झाल्याच पाहायला मिळालं. तत्पूर्वी उपाययोजना म्हणून डॉक्टर आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली होती. जखमी अवस्थेत लोकेश ला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरू झाले. परंतु, अवघ्या मिनिटात त्याने हे जग सोडले, त्याचा या घटनेत मृत्यू झाला. घटनेप्रकरणी पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.