पाणीपुरवठा समिती पुनर्गठित करण्याच्या कारणावरून शहरालगत वाणेगाव येथे दोन गटांत सशस्त्र हाणामारी झाली. यात ८ जण गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे तणावाची कल्पना असतानाही पोलिसांनी आवश्यक त्या उपाययोजना न केल्यानेच हा प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
नांदेडपासून १० किलोमीटर अंतरावरील वाणेगाव येथे गट ग्रामपंचायत आहे. वाणेगावसह भानपूर, वरखेड या गावांचा ग्रामपंचायतीत समावेश आहे. पाणीपुरवठा समितीचा कालावधी संपल्यानंतर ही समिती पुनर्गठीत करण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन केले होते. पुनर्रचना करण्यासाठी काहींनी अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले. त्यावरून वाद झाला. हा वाद पोलिसांनी मिटवला. पण एकीकडे हा वाद मिटत असताना दोन गटांचे समर्थक एकमेकांसमोर भिडले.
भानपूर येथील बालाजी घोगरे, संभाजी घोगरे, यशवंता घोगरे व त्यांच्या समर्थकांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात प्रभाकर सोनटक्के (वय ३५), कमल लांडगे (वय २०), ललिता लांडगे (वय ५०), हेमंत गोरे (वय २५), कमलाबाई घोगरे (वय २०) हे गंभीर जखमी झाले. कमलाबाई घोगरे या गरोदर आहेत. लोखंडी सळई, काठी, तलवारीने झालेल्या या हल्ल्यात जखमी झालेल्यांपकी चौघांना नांदेडच्या गुरुगोिवदसिंग शासकीय रुग्णालयात, तर उर्वरित चौघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या गटाने केलेल्या हल्ल्यात नागोराव घोगरे, श्रीराम घोगरे, दत्ता घोगरे व व्यंकटराव घोगरे हे चौघे जखमी झाले.
हाणामारीचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक डोंगरे लवाजम्यासह वाणेगावात दाखल झाले. स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी जखमींना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. घटनेनंतर आठ तासांनी पोलीस उपअधीक्षक मधुकर औटे शासकीय रुग्णालयात दाखल झाले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती.