एकीकडे संपूर्ण राज्य करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढत असताना महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपाचे सामने पहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी, ट्विटरवर साखर विषयावर महाराष्ट्रात किती पैसे खर्च झाले याचं ऑडीट झालं पाहिजे अशी मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहीलेल्या पत्रात साखर उद्योगाला वाचवण्याची विनंती केली होती. यावर आपली प्रतिक्रीया देताना, निलेश राणे यांनी साखर कारखाने करोडोंची उलाढाल करत असतात, राज्य सरकार, बँकांकडून वारंवार साथ देत असताना…या उद्योगाला वाचवा असं का म्हणावं लागतं असा प्रश्न विचारला.

निलेश राणेंच्या ट्विटरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी, शरद पवारांनी पंतप्रधानांना कुक्कुटपालन व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही उपाययोजना सुचवल्या आहेत, अशी बोचऱ्या शब्दांमध्ये टीका केली.

आणखी वाचा- माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय निवृत्ती केली जाहीर, राजकीय क्षेत्रात खळबळ

यानंतर निलेश राणे आणि रोहित पवार यांच्यात चांगलंच शाब्दीक युद्ध रंगलं. मात्र या सर्व परिस्थितीला रोहित पवार जबाबदार असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. मी साखर उद्योगाबाबत प्रश्न विचारलेला असताना रोहित पवारांनी त्याला नको ते वळण दिलं. मला कोणाशीही वैय्यक्तीत दुष्मनी करण्यात रस नाही, परंतू आमच्यावर टीका होत असेल तर आम्ही शांत राहणार नाही. मुंबईतले ठाकरे आमचं काही करु शकले नाही तर नगरच्या कोपऱ्यात बसून रोहित पवार माझं काय करणार?? अशा शब्दांत निलेश राणे यांनी आपलं रोखठोक मत मांडलं आहे. ते मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

आणखी वाचा- नितेश राणे यांची आदित्य ठाकरेंवर टीका

करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीवर नियंत्रण ठेवण्यात महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचा आरोप करत, राज्यातील भाजपा नेत्यांनी शुक्रवारी महाराष्ट्र बचाव आंदोलनाची हाक दिली होती. सर्व भाजपा नेत्यांनी आपल्या घराबाहेर पडत सरकारविरोधी फलक हातात घेत घोषणाबाजी केली.