शेतकऱ्याला तंत्रज्ञान निवडीचे स्वातंत्र्य मिळावे म्हणून, शेतकरी संघटनेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहितीपर संदेशाचे ईमेल पाठविण्याचे आंदोलन आज (गुरुवार) राज्यभर करण्यात आले.

संघटनेच्या नेत्या सरोज काशीकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी शेती तंत्रज्ञानाबाबत पंतप्रधान तसेच पर्यावरणमंत्री राज्याचे मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांना ईमेलद्वारे अवगत केले आहे. विविध देशात नवनव्या तंत्राज्ञाचा शोध लागत असून, त्याचा प्रयोग तेथील शेतकरी करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत असल्याचेही दिसून येत आहे. याच पाश्र्वाभूमीवर भारतीय शेतकऱ्यांना देखील सरकारने शेती तंत्रज्ञान निवडीचे स्वातंत्र्य बहाल करावे. त्यामुळेच भारतीय शेतकरी जागतिक बाजारपेठेत टिकू शकेल. अन्य देशातील शेतकऱ्यांशी स्पर्धा करू शकेल. नव्या तंत्रज्ञानाला काही पर्यावरणवादी संघटना विरोध करतात. आपल्या देशात ६० टक्के तेल आयात करूनच येते. त्याची कल्पना पर्यावरणवाद्यांना नाही कां? असा सवाल करत संघटनेने भारतीय शेतकऱ्यांना तंत्रज्ञानापासून दूर ठेवण्याचे कारस्थान सरकारने हाणून पाडले पाहिजे, असे आवाहन युवा आघाडीचे सतिश दाणी यांनी केले. सगळ्याच पिकांसाठी स्वातंत्र्य मिळावे हे आजच्या आंदोलनातून स्पष्ट करण्यात आले असून, आंदोलनाचा  पुढील टप्पा लवकरच जाहीर करण्याचे संघटनेने स्पष्ट केले.