करोना काळात आरोग्य सेवेस सक्षम करण्यासाठी बजाज संस्थेने मदतीचा हात पुढे करत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना वैद्यकीय उपकरणांची भेट दिली आहे.

जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेतर्फे ही मदत देण्यात आली आहे. ग्रामीण विकासाचा महात्मा गांधी यांचा विचार प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी बजाज समुहातर्फे विविध उपक्रम राबविले जात असतात. पाणलोट क्षेत्रातील विविध कामांसाठी संस्थेने वर्धा जिल्हा परिषदेला भरीव सहकार्य केले आहे. याच अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सक्षमतेचा मुद्दा उपस्थित झाला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी आरोग्य केंद्रांना मदतीसाठी बजाज संस्थेकडे फार पूर्वी विचारणा केली होती. करोनाच्या काळात आरोग्य सेवा सक्षम असणे अपरिहार्य ठरले होते, ते लक्षात घेवून जिल्हा परिषदेने वैद्यकीय उपकरणांची मदत करण्याची मागणी करून, अपेक्षित उपकरणांची यादी सोपवली. स्वत: डॉक्टर असलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी या उपकरणाची अंदाजित किंमत एक कोटी रूपये असल्याचे सांगितले होते. मात्र चांगल्या कंपनीची दर्जेदार उपकरणे बजाज संस्थेने ५० लाख रूपयात आरोग्य केंद्रांना उपलब्ध करून दिली आहे.

आज उपकरणांच्या वितरणास आंजी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सुरूवात झाली. शस्त्रक्रिया टेबल, फोगर, फाउलरबेड, स्ट्रेचर, व्हिलचेअर, नेबूलायझेशन व अन्य एकूण १८ प्रकारची उपकरणे भेट देण्यात आली आहेत. येत्या आठवड्यात उर्वरित २७ प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपकरणे पोहोचतील. दर्जेदार व योग्य दरात उपकरणे मिळण्यासाठी बजाज संस्थेने छत्तीसगढ, मुंबई, नागपूर येथील कंपन्यांची मदत घेतली.

डॉ. ओंबासे म्हणाले की, बजाज संस्थेने जिल्ह्याच्या विकासात सातत्याने योगदान दिले आहे. सर्व आरोग्य केंद्रांना त्यांच्याकडून मिळालेली मदत आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यास उपयुक्त ठरेल. बजाज संस्थेचे विश्वस्त संजय भार्गव यांनी समुह सामाजिक दायित्वाचा विचार जोपासत असल्याचे नमूद केले. करोना संक्रमणाच्या सुरूवातीच्या काळात संस्थेने गरजू ग्रामीण वर्गाला मदतीचा हात दिला होता. आरोग्य विभागाने काही अद्यावत उपकरणांची मागणी केली आहे. त्याची पूर्तत: करण्याचा प्रयत्न करू, असे देखील भार्गव म्हणाले.