प्रशांत देशमुख 

वर्धा : करोना विषयक अ‍ॅन्टीजेन चाचणी करण्याची प्रशासनाची सक्ती व्यापाऱ्यांनी फेटाळून लावत दुकाने कायमची बंद ठेवण्याचा पवित्रा घेतल्याने आर्वीत तणाव उद्भवला आहे.  करोना संसर्गात जिल्ह्यात आर्वी तालुक्याकडे हॉटस्पॉट म्हणून पाहिलं जातं आहे. आर्वी शहरात व ग्रामीण भागात आतापर्यत ५५ रूग्णांची नोंद झाली. तसेच जिल्ह्यातील पहिला करोना मृत्यू आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील महिलेचा झाला होता.  ८ मे रोजी ही घटना घडली होती.

त्यानंतर सातत्याने आर्वी परिसरात करोना संसर्ग वाढत आहे. आर्वीत आढळलेल्या ५५ रूग्णांपैकी १७ रूग्णांचा बाहेरील प्रवासाचा किंवा तत्सम इतिहास नसल्याने हा आर्वीतील समूह संसर्गाचा प्रकार ठरत असल्याची भीती प्रशासनास आहे. याच पार्श्वभूमीवर आर्वी शहरात ३० तारखेपर्यत संचारबंदी लागू झाली आहे. त्यातच आज प्रशासनाने आर्वी शहरातील सर्व दुकाने, भाजीबाजार, किरकोळ विक्री केंद्रातील मालक व कर्मचाऱ्यांना करोना विषयक अ‍ॅन्टीजेन टेस्ट अनिवार्य केली. आर्वी पालिका क्षेत्रातील दवाखाने व दवाखान्यातील सर्व कर्मचारी, सर्व औषधी विक्रेते व कर्मचारी यांनासुध्दा चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. या संदर्भात तणावाचे वातावरण दिसून आल्यावर जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी आज आर्वीत भेट देवून सर्वांशी चर्चा केली.

डॉक्टरांनी या चाचणीसाठी होकार दिला. मात्र अन्य विक्रेते व दुकानदार यांनी यास स्पष्ट नकार दिला आहे. कुठेही या चाचणीचा प्रयोग झाला नाही. चाचणी झाल्यानंतर येणाऱ्या अहवालावर होणारी कारवाई अत्यंत चीड निर्माण करणारी असते. तसेच संस्थात्मक विलगीकरणाची सोय निकृष्ट दर्जाची असल्याचा व्यापारी मंडळींचा आक्षेप आहे. त्यामुळे चाचणी करणार नाही. भलेही दुकाने कायमची बंद ठेवू, असा निर्धार व्यापारी व भाजीपाला संघाने आज व्यक्त केला. अनिवार्य चाचणी विरोधात शेकडो व्यापाऱ्यांनी आर्वी नगर परिषदेसमोर निदर्शने केली. चाचणी न करता दुकाने उघडल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत कारवाई तसेच दुकानाला टाळे ठोकून दहा हजार रूपयाचा दंड आकारण्यात येणार आहे. प्रशासन चाचणीबाबत ठाम असल्याने तसेच दुकानदार आपल्या मागणीवर अडून बसल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.